Sunday, 29 September 2019

आणि भरल्या नदीत त्यांनी उडी घेतली

*आणि भरल्या नदीत त्यांनी उडी घेतली*

मंडळी अशीच आणखीन एक गोष्ट !!!
कोकणातला पाऊस ज्यांनी अनुभवला असेल त्यांना हे नवीन नाही !!!
पहिला पाऊस असा काय येतो की बस !!! तीन चार दिवस अगदी  सगळं झोडपुन काढतो ,  नदी , वहाळ (ओढे ) सगळं काठोकाठ भरून वहायला लागतात !!

असच एक वर्षी विजुताई , शोभाताई मे महिन्यात गावाला आल्या होत्या . त्यांची सुटी आता संपली होती व जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांना मुंबईला जायचंच होतं.
जूनच्या 1 - 2 तारखेच ST च तिकीट चांगलं 15 दिवस अगोदर त्यांनी reserv केलं होतं !!
मे महिन्याची 29   30  तारीख होती आणि दुपार नंतचा माहोल एकदम बदलला आणि विजांचा जबरदस्त कडकडाट होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली !!
संध्याकाळी पाऊस कमी होईल हा अंदाज साफ चुकला आणि रात्रभर पावसाने थैमान घातले !!
आमच्या घरासमोरील वहाळ कठोकाठ भरून वहायला लागला!!

ताई व शोभाताईच्या तिकीटाचा दिवस जसा जवळ येत होता तस ह्या दोघींचे चेहरे काळवंडायला लागले !!
त्यांना  ST ने जायचं म्हणजे तळवडे व पाचल मधील नदी पार करून जायला हवी .

नदीला साकव (लाकडी पूल ) नव्हताच तर पूल अगदी मी SSC ला होतो त्यावर्षी  म्हणजे 1975 साली झाला .तोपर्यंत शाळेत जाणाऱ्या सर्व मुलींना सकाळी व संध्याकाळी नदी पार करून देणारे पट्टीचे वाहत्या पाण्यात पोहोणारे लोक स्वतःहून हजर असत .
त्यापैकी बबू चवंडे ,(उत्तम पोहणारा पण याला फिट्स यायची ) त्याचाच भाऊ रम्या (पूर्ण नाव मला आजही माहीत नाही ) , कुंमटेकर, तळवड्यातले म्हदेवशेठ  & मधूशेठ कासार म्हणजे यांच घर आणि जन्मच नदीकाठचा म्हणा ना !!
नदी दुतर्फा सोसाटयाने (पाण्याचा भयंकर वेग )वाहताना उतार कुठे मिळेल म्हणजे नदीच्या त्या भयंकर पात्रात कुठे उडी माराली की दुसऱ्या तिराला कुठे बाहेर येता येईल याचा अंदाज अगदी अमावस्येच्या काळोख्या रात्रिसुदधा छातीठोकपणे (expert ) सांगणारे गडी !!

महादेव शेठ कासारांविषयी काय सांगावं !!
लोक म्हणत भरल्या नदीत डोळ्यावर पट्टी बांधून गड्याला पाण्यात ढकला !!! वर आल्याशिवाय राहायचा नाही !! अहो ,  पाण्याखालचा प्रत्येक दगड कुठे आहे कातळ (खडक , याच्यावर आपटला तर संपलच) कुठे आहे ते घरात बसून  सांगणारा हा माणुस!!"

त्या दिवशी रात्रीपासूनच पाऊस अगदी मी म्हणत होता !! नादीने
उग्र रूप घरं केलं होतं !! 
भाऊ आणि ह्या दोघीजणी सकाळी लवकर उठून पाचलला जण्यासाठी निघाल्या . नदीपर्यंत पोचल्या मात्र ....
जवळच्याच घरातील रघुकाका(भाऊंचे मित्र ) आले,  आणि नदीचे ते पाणी आणि रूप बघून " शिरु आज अपील नाही . पाण्यात जाऊ नका !!!"
बापूराव पत्की भाऊंचे मित्र !! एकदम भित्रा माणूस " शिरुकाका काय वेड बीड लागलं की काय तुला . ह्या पोरींना घेऊन जतोयस कुठे ?? घरी चल !! " असं म्हणाले

बापुकाकाना भाऊ म्हणाले "जरा पुढे हो आणि महादेवाला (महादेव शेठ कासार ) मी बोलावलंय म्हणून सांग इथं  !'
तोपर्यंत महादेवशेठना ही बातमी समजली होतीच आणि ते ही धावत धावत तिथे आलेच .!!

नदीच्या काठावरून पुढे मागे जाऊन त्यांनी पाण्याचा अंदाज घेतला आणि ...
" शिरुकाका कसं सांगू... पण आज नदीला उतार (नदी cross करणं)  नाय !! "उद्या सकाळी मी आणि मधु (हे दोघे सख्खे भाऊ ) कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पलीकडे पोहोचवतो!! पण आज नको !! " म्हणाले

कधी नाही ते भाऊंनी ऐकलं आणि ही तिन्ही माणसं घरी परत आली .

अस आत्तापर्यंत कधीच झालेलं नव्हतं त्यामुळे मामीलाही जरा आश्चर्य च वाटलं!!

रात्री पाऊस जरा थांबला की पुन्हा जोरात पडायचा त्यामुळे परिस्थिती फारशी सुधारली नव्हतीच !!
इकडे ह्या दोघींचे चेहरे बघण्यासारखे झाले होते कारण रजा केव्हांच संपली होती आणि आता कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाण भाग होत !

दुसऱ्यादिवशी पुन्हा सकाळी भाऊ आणि ह्या दोघी निघाल्या !!आतापर्यंत ही बातमी गावभर झाली होती . त्यामुळे आता हे लोक नदी काशी पार करतात ते बघायला नदी काठी 40 , 50 जण जमले  होते !!
महादेव आणि मधूशेठ कासार तर ह्यांच्या अगोदरच नदीकाठी पोहोचले होते . नदी तर कालच्यापेक्षाही जोरात वहात होती आणि पाणी कमी होण्याचं कोणतंही  लक्षण नव्हतं !!

महादेव शेठ : मधू , मी शिरूकाकाना शब्द दिलाय त्यांच्या मुलींना मी आज नदी पलीकडे  घालणारच !! भले माझ्या जीवच काय होईल ते होईल पण ही तिन्ही माणस आज पलीकडे गेली पाहिजेत !! '

मधूशेठ : दादा !!  हे काय तू सांगायला हवं !! तुझा शब्द तोच माझा शब्द !!

बापूकाका , रघूकाका सर्वांनी पुन्हा एकदा भाऊंना सांगितलं  "अरे शिरू तुला काय समजतं काय , ह्या पोरींकडे बघ , पाण्यात जर धरलेला हात सुटला तर तुमची हाडं सुद्धा नाही मिळायची !!"

भाऊ : आज एकतर  ह्यांना घेउन पलीकडे तरी जाईन नाहीतर...

महादेव शेठ : काय बोलता शिरुकाका !!
मी असताना   ... "नाहीतर काय ... काय बिशाद लागलीय या पाण्याची ... मधु ह्या (शोभाताई ) मुलीचा हात धर आणि चल.. त्या शेरणीच्या (एक नदिच्या पात्रात उगवणारी वनस्पती ) बेटाच्या वरच्या बाजून पाण्यात उडी घे !! पण लक्षात ठेव माझा शब्द आहे !! पोरीला पलीकडे नेल्याशिवाय हात नाही सोडायचा !! 
चल ...मी पण आहेच ह्या दुसऱ्या मुलीला घेऊन तुझ्या पाठोपाठ !! "

भाऊ म्हणाले मी पण येणार ... मीही हिचा (ताईचा) हात धरतो खालच्या बाजूने !!

रघुकाका बापुकाकाना म्हणाले आता हा कोणाचंही ऐकणार नाही  आणि आपल्या डोळ्यासमोर काही व्हायला नको !! मी घरी जातो !!

इकडे शोभाताईला धरून मधूशेठनि पाण्यात उडी घेतली मात्र !! आणि... आणि ..
दोन सेकंद ही दोन्ही माणसं जी पाण्याखाली गेली ती दिसेनाशीच झाली आणि  ... आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला !!!

तेवढ्यातच म्हदेवशेठ ,ताई आणि भाऊ हे पण पाण्यात शिरले होते !!

आता हे सगळेच पाण्याबरोबर वहात  जाणार अस वाटून काठावरच्या लोकांनी आरडा ओरडा करायला सुरुवात केली !!

याना वाचवण्याचा कोणतंही साधन नव्हतं !! उघड्या डोळ्यांनी बघण्यापलीकडे काहीही करता येण शक्य नव्हतं . लोक बोलत होते ...

"तरी आम्ही सांगत होतो पाण्यात जाऊ नका .. नदीच मारा घ्यायच वर्ष आहे !
(म्हणजे या वर्षी नदी माणसांचा बळी घेते)
एवढ्यात पाण्याबरोबर थोडं  वहात जाऊन मधूशेठ आणि शोभाताई बाहेर दिसले ...दोन तीन वेळा अस झालं आणि ह्या जोडीने अर्धी नदी पार केली !!

पुन्हा एकदा दोनदा बुडक्या मारल्या व हे दोघे कसे बसे दुसऱ्या बाजूच्या काठाला लागले !!

महादेव शेठ धोरणि  माणूस त्यांनी ताईचा एक हात स्वतःच्या खांद्यावरन धरला आणि लहान मुलाला जस पाठूनगळीला घेतात तस घेतलं , दुसऱ्या हाताने भाऊंना पकडलं आणि काहीही झाल तरी घाबरू नका !! जिवात जीव असे पर्यंत दोघानाही सोडणार नाही भले  माझं काय व्हायचं ते होऊ दे !! अस म्हणून ते ही पाण्यात शिरले !

त्यांची पण अवस्था आणखी बिकट झाली .
ते पाण्यात शिरले आणि पावसाला जोरात सुरवात झाली .
लोक म्हणू लागले वर (नदीचा उगम जिथे होतो ती जागा )  पाऊस कोसळतोय !! नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढायला लागली !!  आणि ..आणि फक्त ताईच डोकं तेवढं दिसत होतं बाकी ह्या दोघांच काहीही दिसत नव्हतं !! पाऊस तर मी म्हणत होता !!

आता सर्व परमेश्वराच्या हाती होत !

त्या परिस्थितीतही ही तीनही माणसं पलीकडे येतील ह्याची खात्री असणारा एकमेव माणूस म्हणजे मधूशेठ जे पलीकडे शोभाताईला घेऊन पोचले होतें .
ते शोभाताईला सारखं सांगत होते ! "तू भिऊ नकोस !!
जर काय तशीच वेळ आली तर मी पुन्हा पाण्यात उडी घेइन!!
पण दादा आहे तो !! पलीकडे येईलच !!
तेच खरं होतं!! जेव्हा ही माणसं आम्हाला नदीच्या पात्रात दिसली तेव्हा त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केला होतं !!

आता पुढे पाण्याचा वेग तसा कमी होता . महादेवशेठ नि ते उरलेलं अंतर सहज पार केल आणि आपला दिलेला शब्द खरा करून दाखवला !!

पलीकडे गेल्यावर हे दोघे भाऊ पुन्हा थोड्या नदीच्या पाण्यात गेले,  हाताच्या ओंजळीने थोडं नदीचं पाणी प्यायले आणि त्यानी नदीला नमस्कार केला !!

तुमच्यामध्ये हिम्मत असेल, स्वतःवर विश्वास असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवाला जीव देणारी माणसं तुमच्या बरोबर असतील आणि  आलेल्या वेळीं त्यांची तुम्ही योग्य निवड करू शकलात तर त्या संकटातूनही निभावून जाता येऊ शकत याच हे ज्वलंत उदाहरण !!

आज ह्या जगात माझे वडील --  भाऊ, माझी बहिण विजुताई , मधूशेठ कासार हे भाऊंचे मित्र नाहीत !!!. ह्या जगाचा निरोप त्यांनी केव्हाच घेतला तर महादेवशेठ यांनी वयाची 95 वर्ष पार केली आहेत !!!

पण आजही नदीला जेव्हा पूर येऊन पुलावरून पाणी वहायला लागतं व वाहतूक ठप्प होते तेव्हा लोक म्हणतात ..
"आज पुलावरून पाणी जातंय म्हणून आपण थांबलोय पण भरल्या नदीत उडी घेऊन दोन पोरींना पलीकडे घालणारी तीन माणस आम्ही बघितलीत , त्यांची नाव  " शिरुकाका , मधूशेठ आणि महादेवशेठ, अहो !! त्यांच्या छातीत काळीज नव्हतंच म्हणून पोटच्या पोरींसह भरल्या नदीत उडी घेऊन पलीकडे गेले !!
उलट्या काळजाची माणस ती !!!"

आज जेंव्हा पुलावरून  रोरावत जाणार लाल भडक पाणी मी पहातो तेव्हा या गोष्टीची आठवण येतेच !!
अस वाटतं केवढं धाडस (daring) !! या तीन माणसांनी व दोन मुलींनी केलं . जर  तर  चा विचार त्यांनी केलाच नाही !! वडील आणि त्यांची विश्वासाची माणसं बरोबर आहेत ना !!!
बस ... आपण पलीकडे जाणारच ...!!!

सलाम त्या वडिलांना , त्यांच्या मुलींना आणि जीवाला जीव देणाऱ्या त्याच्या मित्राना !!
🙏🙏🙏

अनंत प्रभुदेसाई

No comments:

Post a Comment