Sunday, 8 October 2023

सख्याहरी

सख्याहरी

लेखन, शब्दांकन 
अनंत (नंदा) प्रभुदेसाई
21 डिसेंबर 2022

मंडळी तळवडे गाव हा अर्जुना नदीच्या काठी वसलेला निसर्गाचे लय लूट असलेला असा सुंदरसा गाव . या गावांमध्ये अत्यंत कलाप्रेमी जसे लोक होते तसेच काहीसे विचित्र लोक पण होऊन गेले .
गावची एक विशिष्ट अशी पद्धत होती ज्याचं नाव वासूदेव असेल त्याला वाश्या, राम नाव असेल तर राम्या , सखाराम असं व्यवस्थित नावाच्या माणसाला सख्या असे म्हणण्याची पद्धत होती . त्याचं ना त्या माणसाला काही वाटायचं , तर ना हाक मारणाऱ्याला ....

आता हाच माणूस बघा ना याचे केस वाढलेले आणि राकट दाढी मिशा वाढलेल्या, अंगात कब्जा म्हणजे बंडी, त्याला वरच्या बटणाच्या ठिकाणी दोरी बांधलेली इतर बटणांचा पत्ताच नाही, खाली पंचा गुंडाळेला कींवा मळकी चड्डी हा झाला त्याचा वेश परंतु वैशिष्ट्य असं याच्या खांद्यावरती दोन तीन मोठी गाठोडी व दुसऱ्या खांद्यावरती तशीच पण थोडी आकाराने लहान असे तीन-चार गाठोडीअसायची.घामाने तेलकट झालेली , ती सुद्धा एकमेकांमध्ये बांधलेली असायची, तो जेव्हा दिसायचा तेव्हा ही गाठोडी खाद्यावरती घेऊन त्यांच्या वजनाने थोडा वाकलेला, तीन-चार दिवसात आंघोळ न केलेला असा तो फिरत असायचा...
मंडळी अशा ह्या माणसाला सख्याहरी असं म्हणत , भले त्याचं नाव सखाराम रबशे असं होतं हे मला ऐकून माहिती होतं.....
आता ही गाठोडी त्यात काय असेल हे एक मोठं कोडंच होत , कारण त्याने स्वतःही कित्येक दिवसात ती सोडून पाहिली नव्हती. लोक म्हणत त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळचे पैसे आहेत ,चांदीची नाणी आहेत, सोन्याची सुद्धा असू शकतात ...कोणालाच काही नक्की माहित नव्हतं.....
आता हा माणूस 
रात्री राहतो कुठे ?
खातो काय ?
जगतो कसा?
हेही आम्हा मुलांना माहीत नव्हतं....
एक मात्र नक्की होतं. दुपारच्या जेवणाच्या अगोदर म्हणजे साधारणपणे दीड दोन वाजता ही स्वारी आमच्या घरी यायची. तसं आमचं घर ऐस पैस असल्यामुळे आणि त्या त्याच्या गाठोड्यांना कोणीही हात लावणार नाही याची खात्री असल्यामुळे बाहेरच्या पडवीत गाठोडी ठेवून तो अर्धा तास चक्क झोपायचा. जाग आल्यावर आम्ही मुलं त्याला विचारायचो...
सख्या, या गाठोड्यात काय आहे रे , जरा उघडून दाखव ना.... 
तो शून्य नजरेने आमच्याकडे पाहायचा....
आणि विचित्र हसायचा...
तोंडाने काहीतरी पुटपुटायचा...

"सख्या,अरे ही गाठोडी कोणीतरी घेऊन जाईल एक दिवस " 
असं आमचे काकालोक त्यांला सांगायचे . या सगळ्या बोलण्याचा त्याच्यावर बिलकुल परिणाम व्हायचा नाही आणि तो त्याला काहीही प्रतिसाद पण द्यायचा नाही.....
त्याचा संवाद फक्त मामी शी म्हणजे माझ्या आईशी चालायचा तो फक्त तिच्याशी बोलायचा ....

"वयनी , उभा र्हाव का जाव?"....

म्हणजे थोडा भात वरती थोडी आमटी जराशी भाजी असं त्याला माझी आई रोज द्यायची. त्याला उंडी म्हणत. तर हा विचारायचा 
ती देतेस की मी जाऊ....!

म्हणजे एका भिक्षेकरीची भिक्षा मागण्याची ही पद्धत होती.....
ऐकणार्याला खुप विचीत्र वाटायचं...
यात विनंती बिलकुल नव्हती.......
उद्धटपणाही वाटू शकेल...
पण तसं नव्हतं....

उंडी देत असलीस तर थांबतो नाहीतर जातो.... 

असं साधं सोप तो त्याच्या पद्धतीने सांगायचा....

कधी कधी आमची एखादी काकू येऊन 
"अरे सख्या ,आज जेवाणाला वेळ आहे  अजून"
असं सांगायची 
याच्यावर परिणाम शून्य.... 
तो एकच म्हणायचा ....

"थोरलया वयनीस बोलाव"
( मामी घरात मोठी म्हणून थोरली वहिनी हे तिचं नाव)

मग मामी बाहेर यायची 

"अरे ,आज जेवण  व्हायला थोडा वेळ आहे.... तू बस....  झालं की सांगते...."

"हाँ .... ज्वान ज्वान जानार तरी खय ?"...
तो स्वतःशीच बोलायचा....

"अरे सख्या रोज कसली उंडी मागतोस"
माझे काका कधी कधी त्याला म्हणायचे.... 
त्याचा सख्यावर काहीही परिणाम होत नसायचा....
तो मुख्य म्हणजे कोणाकडेही लक्षच द्यायचा नाही आणि मामी त्याला उंडी दिल्याशिवाय जाउ द्यायची नाही....
हा रोजचा कार्यक्रम असायचा....

मामी,  तू याला रोजच उंडी का देतेस?

यावर ती म्हणायची ....

"अरे आपलं चांगलं वीस-पंचवीस माणसांचं भरलं घर आहे , दुकान आहे , गडी माणसं आहेत, दिवसा मागे काहीतरी अन्नदान करावं... हा भीक्षेकरी आपल्या दारी रोज येतो म्हणून अन्नदान तरी होतं ....आणि हा सखा, साधा माणूस नाहीये आता त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो असं घरी घरी फिरून अन्न मागतो व त्याच्यावर गुजरण करतो...त्याच्या एक एक गोष्टी  सांगायच्या म्हटल्या तर दिवस नाही पुरणार.....
सांगीन कधीतरी....."

आता अशा कोणत्या गोष्टीं मामीला माहित होत्या व ती सांगणार होती......


क्रमशाः
पुढच्या भागात....