*सप्रे गुरुजी*
पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे नंबर 1 .या शाळेला आपलयाच गावातील लाभलेले हे मुख्याध्यापक .
आमची ही शाळा त्याकाळी १ ते 7 वी पर्यंत होती . मी याच शाळेतून 1971 साली सातवी पास झालो .
मला लाभलेले सप्रे गुरुजी यांनी आम्हाला 5 वी आणि 6 वी मध्ये शिकवल्याच आठवतं...
मंडळी त्या काळी एकच गुरुजी सगळे विषय शिकवायचे .त्यामुळे कोणताही विषय शिकवताना वेळेच बंधन नसायचं !!
सप्रे गुरुजींचे आवडते विषय इतिहास , भूगोल आणि सर्वात आवडता विषय गणित होता.
इतिहास त्यातील शिवाजी महाराजानी गनिमी काव्याने जिंकलेल्या लढाया ते इतक्या खुलवून सांगायचं की खूप मजा यायची ऐकायला.
पेशवाई , त्यातील माधवराव पेशवे यांच्यावरचा धडा शिकवणं चक्क दोन दिवस चालायचं . त्यातच आमची शाळा सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा असायची.
एकदा शाळेत गेल्यावर आमचं म्हणजे नीदान माझं तरी लक्ष शाळा सुटते कधी इकडेच असायचं त्यमुळे गुरुजींनी सकाळी शिकवलेली कोणतीही गोष्ट संध्याकाळी फारशी आठवायची नाही ....
कधी कधी तेह विचारायचे ..
"हा ... सांगा... आपण कुठपर्यंत आली होतो... "
आणि हे काम उषा , पुष्पा ह्या हुषार मुली लगेचच सांगायच्या व बाकीच्यांची सुटका व्हायची ...
शेवटी माधवराव पेशवे यांनी आठ दहा वर्ष वय असताना संपूर्ण राज्य कसं सांभाळलं आणि तुम्ही काय करत आहात याची तुलना करून धडा संपायचा ....
भूगोल हा विषयही ते आवडीने शिकवायचे पंजाब मध्ये असणारी शेती , बंगालमध्ये चालणारी मासेमारी व त्यावर होणारी उवजीविका, आसाम मध्ये असणारे चहाचे मळे असं खूप काही ते एकदम समरस होऊन शिकवायचे
पण प्रश्न विचारल्या नंतर आम्ही आसाम मध्ये मासेमारी बंगालमध्ये चहा असं सगळं घोळ करून सांगायचो ....
....
"अरे घरी गेल्यावर कधीतरी ते पुस्तक उघडा... वाचा जरा ...
नाहीतर फुल घालून पूजा करा त्याची !!"
हा त्यांचा डायलॉग असायचा ...
सगळ्यात आवडता विषय गणित ...
खूप चांगलं शिकवायचे .
वर्गातल्या मुलांनी उभं रहायचं , ते गणित घालणार आणि तोंडी हिशोब करून उत्तर लिहायची ही (माझ्यासाठी त्रासदायक ) पद्धत होती.
अर्थात 10 पैकी 4 -5 बरोबर यायचे , पण त्यातील एक दोन तरी एकमेकाला खुणा करून , बोट दाखवून वगैरे जे जे शक्य असेल ते सर्व करून लिहिलेलं असायचं त्यामुळे सांग...
" तू हे कसं केलेस ?"
ह्या गहन प्रश्नाचं उत्तर सांगता यायचं नाहीच पण आपण लिहिलेलं उत्तर बरोबर की चूक तेही समजायचं नाही.....
नंतर ते गणितं सोडवण्याच्या पद्धती /रीत सांगायचे आणि उत्तरापेक्षा पद्धत बरोबर असेल तर उत्तर बरोबर येतंच अस म्हणायचे ...
तसं शाळेत काही अतिशय आवडीचे कार्यक्रम असायचे ..
प्रत्येक शनिवार शाळा सारवायची .
अतिशय आवडीचा कर्यक्रम ... कधीही न चुकवण्यासारखा ...
म्हणजे शाळेत गेल्यावर प्रार्थना झाली रे झाली की लगेचच ह्या सत्कृत्यासाठी इतर वेळी मागे असणारी मुलांची टोळी पुढे यायची . मग कुठून कुठून शेण जमवायचं , विहिरीवरून किंवा नदीतून पाणी आणायचं , झाडाचे टाळे घ्यायचे आणि शाळा सुटायची वेळ होऊन गेली तरी थांबून हे काम पूर्ण करायचं !
सगळं झाल्यावर गुरुजी शाबासकी द्यायचे , खूप छान वाटायचं आणि मुख्य म्हणजे या दिवशी कोणत्याही प्रकारचा अभ्यास नसायचा ...
😀
असाच असणखी एक कर्यक्रम म्हणजे
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन असायचं आणि रात्री मुलां मुलींचे नाच , गाणी , छोटी नाटकं असायची. सर्व पालक आपल्या मुलांचे कर्यक्रम पहायला आवर्जून यायचे.
या मध्ये सप्रे गुरुजींचा सहभाग आवर्जून असायचा . ते रंगकर्मीच होते .
त्यांनी एक गाणं बसवलं होतं ...
" लाल टांगा घेऊन आला
आला टांगेवाला ...
ऐक लाला गाणे गातो ला..ला...ला "
याला पचल येथील SVM शाळेत प्राथमिक शाळांच्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं होतं ....
सप्रे गुरुजींच्या घरी सातवीत असणाऱ्या आम्हा मुलांची रात्री शिकवणी चालायची .या करता कोणतंही शुल्क नव्हतं, केवळ रिझल्ट चांगला लागावा हा हेतू होता .
आता असे सेवावृती शिक्षक लाभण शक्य नाही ...
त्यांच्या घरी पोस्ट ऑफिसही होत , तीही जवाबदारी गावच्या हितासाठी त्यांनी पार पडली होती .
मंडळी आपल्या दत्ताच्या उत्सवात कीर्तन करण्याचं महत्वाचं काम काही वर्षे त्यांनी केलं, ज्यावेळी
मंडळाची आर्थिक परस्थिती यथा तथाच होती ....
काही काळ आपण नाटकंही करीत होतो , त्यामध्ये अडलेल एखादं काम हक्काने गुरुजींना सांगावं व त्यांनी ते करावं असा प्रघातच होता ...
या वर्षीच्या उत्सवामध्ये , घरून प्रसाद आणण्याची जी प्रथा आहे ती अकुलने सांभाळली होती. गुरुजींनीही त्या दिवशी प्रसाद आणला होता व हे दोघेही शेजारी शेजारी बसून काही वेळ गप्पा मारीत होते.
तीर्थ प्रसाद झाल्यावर मी , अनुजा , श्रेया आणि अकुल या सर्वांची त्यांच्याशी ओळख करुन दिली आणि आम्ही त्यांना नमस्कार केला ....
"ही तुझी मुलं ...
काय करता तुम्ही .... "
नंतर अनुजाकडे पाहून
" हा एवढासा होता ....आता ...."
एवढं बोलून ते हसले ....
त्यांच्या चेहऱ्यावरून काळ खूप झपाट्याने मागे पडत असल्याची जाणीव झाली ...
केवळ शिक्षकच नव्हे तर गावातील इतर जवाबदर्या तन्मयतेने पार पाडणाऱ्या सप्रे गुरुजींना माझा साष्टांग नमस्कार .
अनंत (नंदा ) प्रभुदेसाई
11 जून 2021