Wednesday, 11 December 2019

आमच्या मामीच साक्षात लक्ष्मी पूजन !!!!

*आमच्या मामीच साक्षात लक्ष्मी पूजन !!!!*


दिवाळी ....
सर्वांचीच असते . प्रत्येकजण ती साजरी करतो आपापल्या परीने ...

एकदा मामी (माझी आई ) लक्षुमी पूजनाच्या दिवशी सकाळी सकाळी आंघोळ करून विहिरीवरून येत होती ...

आमच्या घराच्या समोरच मोठ्ठ सोनचाफ्याच झाड आहे . खूप फुल यायची त्याला . पण फुलं काढणं सोपं थोडच होतं ...
त्या झाडावर चढून फुलं काढावी लागत ...

सकाळी  सकाळी आमच्या दुकानावर बायका, मूल , काही पुरुष मंडळींची गर्दी असायची. 
तर अशाच एका जाणत्या गड्याला मामीने सांगितलं ....

" अरे गणू !  जरा चाफ्याच्या झाडास पाय लाव (म्हणजे त्या झाडावर चढ )  आणि  चार फूल काढ बघू ... तुझ्यासाठी चांगला गरमा गरम चहा ठेवलाय ......"

" वयनी , चाय काय करायची !! आज लक्षुमी पुजायची ना . हायत तेवढी सगली फुल देतंय तुला काढून ..."   गणू

त्याने चांगली २५ - ३० फुल काढून दिली मामीला !! एकदम टवटवीत, सुरेख व मस्त वास येत होता त्यांना ...

गणू :  " वयनी फुल ठिवलीयत हीत .. ....जातो आता...

पन चाय देत होतीस ना....

सगळा देवाण घेवणीचा हिशेब आता पुरा झाला !!!😃😃😃
 
ही सर्व फुल काढताना , घरात नेताना दुकानावर आलेल्या एका बाईने पहिली . ती म्हणाली ...

" वयनी ,  लय शान फुल , चांगली देव पूजा कर , आजचा दिस पण लय चांगला हाय .  देव तुला पावल ..."

आता दुपारची पूजेची वेळ झाली होती !!  मामी पूजेची तयारी करून देत होती . इतक्यात काय झालं माहीत नाही ....

मामीने सकाळी काढलेली ती सगळी फुलं एका परडीत घेतली आणि चक्क घराबाहेर निघाली ...

मला म्हणाली 
"चला जरा माझ्या बरोबर ...."

"पण कुठे जायच मामी ..."

"चल मी सांगते तिकडे ....
 आणि ही फुलं  कुठे  घेऊन जात्येस ......"

थोड्याच वेळात मी आणि मामी बुद्धवाडीत येऊन पोचलो .

तिथे आम्हाला  वासू बुद्ध भेटला ...
" वयनी ! खय जातीस खय... दोंपारची (दुपारची )आणि आंघुल्या करून इकडं खय  घाणित ह्या......" 

मामी : " वासू बर झालं भेटलास ...ती कोटकराची सून , ताई... गरोदर  आहे ती...  तीच घर कुठलं !!!" 

 वासू :  " ह्य काय बाजूचंच... पण तू खय जातीस !" 

 "तिच्याकडेच "  मामी

वासू : "" ताई ! हायस खय !!  ही बघ थोरली वयनी  (मामी घरात मोठी म्हणून तीच नाव " थोरली वयनी " ) आलीय आणि तुला साद घालतेय ...

ताई :  अग बाया ,  वयनी तू कुठं जातीस !! मला  सांगशीला तर मी आली असती न्हवं !!!"

मामी : " ते जाऊदे !! जरा पदर पुढे कर ....
मामीने ती सगळी फुलं तिच्या पदरात टाकली ...

ही घे बघू सगळी फुलं तुला !!" 
......
ताईला थोडा वेळ काही समजलच नाही ...

आता ती बाई फक्त रडायची बाकी होती व मी उगाचच सकाळी बोलले अस म्हणून स्वतःलाच दोष देत होती .

मामी : " अग रडतेस कसली !! ही फुल घे आणि चांगला वास घे बघू त्यांचा ...."

आशा दिवसात तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण राहत नये ....

माझा देव काय रोजचाच आहे आणि त्याची पूजाही रोजचीच ..."
.............

आता मामी मला म्हणाली चल लवकर घरी संध्याकाळी लक्ष्मी पूजन आहे भटजी येतील उशीर नको व्हायला ....

आता हे जेव्हा मला आठवतं तेव्हा वाटतं मामीच साक्षात लक्ष्मी पूजन मुहूर्त न पाहताच केव्हांचच पार पडलं होतं  ....

बाकी होतं ते फक्त मुहूर्तावरच लक्ष्मी पूजन ......


अनंत प्रभुदेसाई .