Monday, 15 June 2020

सह्याद्रीची लेक - अरुणा वायकुळ

*सह्याद्रीची लेक - अरुणा   वायकुळ*

ते वर्ष होतं1972-73  च. पाचल च्या सरस्वती विद्या मंदिर च्या मैदानावावर रात्रीच्या वेळी मोठी लगबग दिसत होती . सर्व व्हॅलीनटीयर्स म्हणजे  गांधीसर, शशी सक्रे, अरुण साबळे अशा सर्वांनी  कबड्डीच ग्राउंड तयार केलं होत.
कारण उद्या येथे एक प्रसिद्ध कबड्डी चा सामना रंगणार होता.त्याच atraction म्हणजे पहिल्यानेच (त्याकाळी ) मुलींचा कबड्डीचा सामना होणार होता. 

सरस्वती विद्या मंदिर विरुद्ध इतर सर्व शाळा. 
मंडळी लक्षात घ्या एका शाळेच्या टीम विरुद्ध इतर सर्व शाळांमधील कसलेले खेळाडू . 
हा सामना SVMच्या  ग्राउंडवर खेळला जाणार होता . गांघी सरांनी त्यांचं कौशल्य पणाला लावून टीम तयार केली होती . प्रत्येक खेळाडू कडून कसून प्रॅक्टिस  म्हणजे सर्व्हिस मध्ये कोपरा कसा मारायचा , पकड करण्यासाठी दुसऱ्या बाजूने खेळाडूनी घेरल्यावर  हाय जंप घेऊन किंवा बगल देऊन मध्य रेषा कशी गाठायची अश्या खूप प्रकारच्या tacties अगदी कसून करून घेतल्या होत्या .

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 9.30 वाजता सम्पूर्ण ग्राउंड प्रेक्षक व मुलांनी भरून गेलं. आम्ही सर्व SVM ची मुलं   एकदम शिस्तीत ग्राऊंडच्या दोन बाजूना उभे होतो .

सर्व प्रथम rest of the school ची टीम ग्राउंडवर येऊ लागली. त्यानी निळ्या रंगाच्या पॅन्ट व आकशी रंगाचे 
T. Shirt घातले होतें. 
Captain ने संथ लयीत धावत पहिल्याने ग्राऊंडला नमस्कार केला व तिच्या मागोमाग सर्वांनी तिचच अनुकरण करीत ग्राऊंडला दोन फेऱ्या मारल्या व आपल्या position घेतल्या. 
नंतर मोडक सर , त्यांचे कोच आले व त्यांनी एक कटाक्ष मैदानावर टाकला. 
तरबेज व कसलेल्या कोचची नजर होती ती...
कॅप्टनच्या कानात त्यानी झटकन निर्णय सांगितला taaus जिंकला तर काय आणि हरला तर काय ...

आता SVM ची टीम . आमचा ड्रेस  खाकी पॅन्ट व व्हाइट T shirt .
प्रथम कॅप्टन अरुणा वायकुळ हिने ग्राऊंडला नमस्कार केला व सम्पर्ण टीम मध्य रेषेजवळ येऊन उभी राहिली .
दोन्ही कॅप्टन taaus करण्यासाठी पुढे आले. अरुणाने सर्वप्रथम त्यांच्या कॅप्टनला शेक हँड केला व तिला आणि तिच्या टीमला best of luck दिल व आपल्यातील खिलाडू वृत्तीच दर्शन घडवलं . 

Taaus त्यांनी जिंकला आणि SVM  च मन थोडं नाराज झालं .
खेळाला सुरवात झाली.
ROS (rest of school  team) च्या तीन नंबरने sevice केली  व परतली.
आता SVM च्या कुंदाने सर्व्हिस करण्यासाठी त्यांच्या तीन नंबरच्या खेळाडूचा पाठलाग केला , एकदम डीप कोपरा घेऊन पहिला पॉईंट SVM ला मिळवून दिला.
आता ROS च्या कॅप्टनने इतक्या झटकन सर्विस केली व दोन्ही कोपरे न घेता SVM च्या टीमवर मधोमध अटॅक करून तीन गडी बाद केले. 

सुशिला सर्व्हिस करून माघारी आली. 

आमचे 4 गडी आणि त्यांचा अटॅक . 

6 नंबरची सर्विस. डीप कोपरा , हाताने अरुणाचा थांबायचा सुशीलाला इशारा ... मधल्या छायाचा हात तिने सोडला....आणि चित्याच्या चपळाईने छायाने तिची तंगडी पकडली ...बस एकच हुर्यो झाली .
SVMच्या चित्रा हिला जीवदान मिळालं.

चित्रानेच सर्विस केली व परतली.

त्यांच्या 4 नंबरची सर्विस , मध्ये अटॅक .... फास्ट उजवा कोपरा... मध्ये गडी टिपण्याचा प्रयत्न.... डीप डावा कोपरा ... ओह .... हे काय झालं .... ...
SVM ची पकड चुकली आणि पुन्हा 4 गडी बाद. 

आता आमच्या शेवटच्या खेळाडूला सर्विस साठी  डीप घुसून पॉईंट मिकवण्या शिवाय पर्याय नव्हता . 

पण तिची पकड त्यांनी केली व आम्ही पहिला लोण घेतला व मध्यंतरसाठी खेळ थांबला.

5 मिनिटांतच पुन्हा खेळ सुरू होणार. कोच नि आपापल्या टीमला मर्गदर्शन केलं आणि अंपायर नी शिटी वाजवून खेळला सुरवात झाली.

SVM  6 गुणांनी मागे .

ROS ने सर्विस करुन परतणार इतक्यात छायाने तिचा पाठलाग केला... तिला टच करून रिटर्न होतोय अस भासवून पुन्हा एकदम आत घुसून आणखी एकीला टिपलं.
5 नंबरच्या खेळाडूला टच लाईन च्या जरापुढे येताच अस काय उचललं की ती ग्राऊंडच्या बाहेरच गेली.

आता अरुणा सर्विस ला गेली ....

डीप कोपरा ....दुसऱ्या बाजूला चपळाईने जाण्याची हूल ... आणि ... कोपर्यातल्या खेळाडूला टच करताच तिने व तिच्या बाजूची ने  पकड करण्याचा प्रयत्न  व दोन पॉईंट वसूल.

ROS च्या कॅप्टनची सर्विस ... SVM च्या दोन्ही कोपरयातिल खेळाडूंनी नजरा नजर केली , इशारा पक्का ....
आणि ...आणि तिला उचललंच ...

पुन्हा अरुणाचीच सर्विस ...मध्ये अटॅक ...आणि दोन्ही टोकाच्या मुलींनी एकदम पकड करण्यासाठी घेरलं आणि ... क्षणात जंप घेऊन तीने मध्य रेषा गाठली. ROS चे चार खेळाडू आउट.

आता राहिलेल्या दोघीपैकी एक जण साधी सर्विस करून परत.

छायाची सर्विस  .... दोघींनाही टीपायचंच ...
एका पोऱ्यात डीप अटॅक ... टच ...दुसरी पाय पकडण्यासाठी मागून आली ..... तर तीलाच दोन पायांच्या मधून मागे ढकलून मध्य लाईन टच .

ROS वर  लोण.

दोन्ही संघ समान गुण.
8 च मिनिटं बाकी. 
ROS च्या कॅप्टनची सर्विस .... टाइम पास....पुनः डीप डावा कोपरा ..... सुशीलाचा पकड करण्याचा प्रयत्न ... फसला ....2पॉईंट मिळाले.

SVM कडून छायाची सर्विस ....त्यांचा पकड करण्याचा इरादा ... डीप डाव्या बाजूने दुसऱ्या बाजूला येताना ,मधल्या खेळाडूने डाव साधला ...

3 गुणांची आघाडी ROS कडे. व शेवटची 4 मिनिटं बाकी . 

साधी सर्विस करून त्यांची खेळाडू परत. 

Do or die
अरुणा सर्विस मधेच पॉइंट घेणार हे निश्चित . 
कोपऱ्यात पायाने टच , बाजूचीला हातानें ..... आणि....दुसऱ्या बाजूने पकड करायला येणाऱ्या दोघींच्या वरून जंप घेऊन डायरेक्ट मध्य रेषा.

आणि सामना संपल्याची शिटी वाजली . 

SVM ने सामना जिंकला होता.

सामना जिंकणं महत्वाचं ,किती गुणांनी जिंकला याला महत्व नाही. जस दोन्ही संघ मातब्बर असतील तरच खेळांची मजा अनुभवता येते. 

मंडळी अरुणा वायकुळ ही SVM ला लाभलेली अतिशय गुणी खेळाडू. हिने लॉंग जम्प , हाय जंप 
रनीग , कबड्डी या सर्व प्रकरांमध्ये आपल्या शाळेचं नुसतं प्रतिनिधित्वच नाही केलं तर शाळेचं नावही उज्वल केलं . 
आंतर शालेय, तालुका , जिल्हा , राज्य स्तरीय लेव्हलला खेळून शाळेला सन्मान मिळऊन देणारी रकमेव खेळाडू. 

हिचा कबड्डीचा खेळ व पकड करण्याचं कौशल्य बघून बारामतीमध्ये सत्कार करताना श्री. शरद पवार त्यांच्या मिस्कील भाषेत म्हणतात ...
'या कडे कपारीतिल सह्याद्रीच्या  हिरकणीची पकड म्हणजे चक्क गुळाला जसा मुंगळा चीकटतो ना तशी असते, एकदा का तंगडी पकडली की बस ....सुटका फक्त शिटी वाजल्यावरच "

त्रिवेंद्रमला उंच उडीसाठी हिची निवड झाली , पण पवार साहेबांच्या भाषेत बोलायचं झालं तर ह्या वाघिणीच्या पायात साधे बुटसुद्धा नव्हते .

मंडळी तो काळ आठवा, त्यावेळी अकरावी एस एस सी ची परीक्षा द्यायला आपल्याला राजपुरला जाव लागायच .कारण आपली शाळा SSC Center नव्हती.
तर अशा खडतर परस्थितीतसुद्धा जिने शाळेला राज्यस्तरीय सन्मान मिळवून दिला त्या अरुणाला , त्या सह्याद्रीच्या लेकीला आम्ही सलाम करतोय!!

*अनंत प्रभुदेसाई*

Friday, 10 April 2020

माझी घर खरेदी..... भाग ३ ..

माझी घर खरेदी..... भाग  ३ ...

अनुभव - शब्दांकन 

नंदा प्रभुदेसाई 

एक दिवस अनुजाला ऑफीसमधून यायला थोडा उशीर झाला म्हणून तिला सोडायला तिचे बॉस आले होते घरी . तेही ठाण्यातच रहात होते . माझी त्यांच्याशी ओळख करून दिल्यावर ते म्हणाले तुमचं HDFC च जे लोन आहे ते परत करण्यापेक्षा हे घर विका आणि चांगल्या ठिकाणी दुसरं घ्या !!!

त्यांना काय सांगणार माझी कहाणी!!! 

ठाण्यामधला चांगला एरिया म्हणजे भास्कर कौलनी, चांगली शाळा सरस्वती, खरेदीचं चांगलं
ठिकाण गोखले रोड - नौपाडा . आपण इकडे जगा घेऊया का  ??? .......... मी !

वेड लागलंय का ... इतर लोक काहीही सांगतील , आता आधी आपल्या मुलीला चांगल्या शाळेत घालू ,मग नंतर सगळं ..

एक दिवस फिरत फिरत भास्कर कौलनी मध्ये आलो व एका बील्डिंगच बांधकाम चाललं होतं ते पाहायला म्हणून थांबलो.
चौकशी केल्यावर बरेचसे फ्लॅट बुक झाले असले तरी 4, 5 खाली आहेत  अशी माहिती मिळाली. रेट   रू.1000 psf. 1bhk  Rs.6.50 lakhs ....
नाही जमायचं आपल्याला ....

सध्याच्या घराचे 3.50 L तरी मिळाले पाहिजे व 3L लोन असं झालं तर .... ...

आमच्या घराला एका agent ने पार्टी आणली . ते NRI वाले होते . त्यांनी सर्व पैसे  एकदम देऊ पण किंमत 2.50 लाख व घराचा ताबा लगेचच पाहिजे अशा अटी घातल्या. ...

विचारचक्र सुरू झालं. पुन्हा रात्री झोप नाही. आता आम्ही दोन , एक छोटी मुलगी आणि आतापर्यंतचा विदारक अनुभव ....

.......  आणि आम्ही त्या पार्टीला रहाती जागा एका पोरीला हातातोंडाशी पकडून विकून टाकली . .....

त्यांच्या अटी ची जाणीव म्हणजे ताबा लगेचच द्यायचा मी कबूल करून बसलो . 

"आधी पैसे तर देऊ देत मग बघु ... वाटलं इतकं का सोपं आहे ते......"

माझा अंदाज इथेच साफ चुकला आणि ठरलेली रक्कम त्यांनी माझ्या bankमध्ये जमा केली, उरलेली हातात दिली , आणि आज शनिवार आहे , उद्या आम्हाला घराची किल्ली पाहिजे , आज रात्री आमचे वडील इथेच तुमच्याबरोबर रहातील .(पैसे घेऊन आम्ही पळालो तर )अस सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली.....


आता काय करायचं , कुणाला सांगायच ? आणि ह्या छोट्या मुलीच कसं होणार ? ...


पहिल्यांदा भास्कर कॅलिनीतील त्या बिल्डरला गाठलं , यावेळी दादा बरोबर होता, शेवटचे 2 ब्लॉक बाकी होते , त्याने कींमत 7 लाख सांगितली आणि मी हुज्जत घालायला सुरुवात केली .... 

"तुम्ही पहिल्याने 6.50 सांगितले होते व मला जास्त किंमत का सांगता ? मला जागा घ्यायची आहे !! "

" वो तो जमानेकीं बात हो गयी , यकीन करो कल ही मैने 5 वा माले का फ्लॅट यही भाव से बेचा है !"

"कितने मे बेचा है " 

" जो भाव तुमको बोला वही , हम मारवाडी है , जबानके सच्चे राहते है "

" चलो जो भाव पे आपने 5 वा माले से लिया वही मुझे लगा दिजीए "

आमची जुगल बंदी ऐकून दादा म्हणाला मी घरी जाऊ का ? तू काय यांच्या नादाला लगतोस ...
तस सुद्धा दादा चा एकंदरीत स्वभाव , त्याच ते मितभाषी पण या तत्वात माझं हे बोलणं म्हणजे त्याने तिथे थांबणं मुश्किलच होत.

मी पुन्हा एकदा त्यांना म्हटलं 

"हे 10000 घ्या आणि मला त्या 5व्या मजल्यावरच्या चा रेट लावा ."


" 7 लाख में कम नही होगा,  जबान की कोई इज्जत तो करो "
" आपने 5 वा माले का फ्लॅट 1000 रुपये के भाव मे बेचा है और वो भी कल"  मी जोरात टेबलावर हात आपटून सांगितलं 
" आपके पास क्या सबुत है , जो भाव उसको वही अपको मीलेगा, जाओ पैसा नही तो  ब्लॉक खरीदनेके लिये आते ही क्यू  ?? "

.....  आणि मी त्याला शब्दात पकडलं , दादाला तिथेच थांबवून स्कूटर वरून 10 मिनिटात बाळा च्या घरी गेलो , त्याला सगळं सांगितल,  तू फक्त तुझा रेट त्याला सांगायचा ... बस माझी जागा पण बुक होतेय ...


कारण 1000 च्या रेटने बाळाने जागा बुक केल्याचे मला सांगितल होत.

जस त्या बिल्डरने बाळा आणि मला पाहिल तस त्याचा चेहरा एकदम उतरला ..... जबानीची सच्चाइ उघडी पडली आणि माझी , 8 व्या मजल्यावरची जागा रु.1000 च्याच रेटने बुक झाली .....  !

हुष्य !!! अजून लढाई संपली नव्हती तर आता कुठे सुरू झाली होती....

ज्या agent ने आमची सध्याची जागा विकली होती त्याला गाठलं व मला 6 महिन्यांनसाठी रहायला भाड्याची जागा पाहिजे व ती सुद्धा आजच, भाडं जास्त चालेल, deposit चे पैसे खिशात घेऊन आलोय,  अग्रीमेंट नंतर करा आधी जागा द्या ! असं सांगितलं.  इकडे उद्या संध्याकाळी ह्या माणसाला किल्ली द्यायची होती म्हणजे मी अनुजा व पोरगी घराबाहेर , कारण तसच ठरलं होतं!!!

सद्गुरू मधला एक टेम्पो भाड्याने घेतला , घरच सामान दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर न्यायचं आहे म्हणून आत्ताच टेम्पोत भरा म्हणून सांगितलं.
चौकशी करून दिवसाला  कमीत कमी 500 रुपयांचा धंदा टेम्पो मालक करतो याची माहिती घेऊन ठेवली होती. 
अजूनही भाड्याची जागा मिळाली नव्हती ,म्हणजेच वेळ आली तर दिवसाला 500 रुपये देऊन सामान टेम्पोतच ठेवायचं याची तयारी केली होती.

Agent ने मित्राचीच जागा आहे,  भाडं 3000 व deposit 15000 सांगितलं .  " भाडं 4000आणि Deposit 20000 मी देईन "  पण जागा उद्या सकाळी ताब्यात पाहिजे , अग्रीमेंट करा किंवा नका करू कारण मला 6 महिन्यांसाठीच भाड्याची जागा पाहिजे , माझी नवीन जागा भास्कर कॉलनी , वर्धमान टॉवर या बिल्डींग मध्ये मला 4 महिन्यातच मिळणार आहे अस सांगितलं ....

 Agent ने त्याच्या पद्धतीने  मी सांगितलेलं सर्व चेक करून मला भाड्याच्या जागेची किल्ली देऊन टाकली.

घरी हा म्हातारा माणूस व आम्ही त्या रात्री राहिलो , सकाळी उठल्यावर चहा पाणी झालं ...

"काका , ठरल्याप्रमाणे ही किल्ली तुमच्या ताब्यात घ्या , आज संध्याकाळ पर्यंत सामान शिफ्ट करीन ...... जे इथे राहील ते तुमचं...व जे नेलं ते माझं "


"अहो तुम्ही कुठेही रहाल पण ह्या छोट्या मुलीच काय कराल ?" 

एक काम करा , दुसरी जागा बघा , तुमचं सामान 4- 5 दिवसात शिफ्ट करा व नंतर हे घर आमच्या ताब्यात द्या , ही घ्या किल्ली , जरा ह्या मुलीचा विचार करा ,  फॅमिली वाले आहेत ना तुम्ही ...... त्या आजोबांची खात्री पटली की त्यांना कोणत्याही परिस्थितीत मी जागा  देईनच...

मंडळी 4 च महिने भाड्याच्या घरात राहिलो , अतोनात हाल व्हायचे , विकत ची पोळी भाजी खायची , मुलीला सकूटरवरून न्यायचं , आणायचं आणि काय काय केलं ....


एकदा असच ही जागा बघायला आम्ही दोघ गेलो होतो , त्यावेळी अनुजा ने ओट्या साठी काहीतरी change सांगितला तर तो  बिल्डर म्हणाला , 
 
" ये तो शादिके पाहिलेही बच्चेकी बात हो गयी , पहिला सब पैसे लाव बादमे देखेंगे "

इथे एक फार महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अनुजाच्या ऑफिसच loan फारच लवकर व एकदम कमी कष्ट करून मिळालं , नंतर तर त्यांनी स्टॅम्प duty चे ही पैसे दिले .

ठाण्याच्या ज्या भागात जागा सोडा पण कधी नुसतं बघायला तरी येइन अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तिथं रहायला आलो.....

नंतर दादानेही याच बिल्डींगमध्ये मोठी जागा घेतली.

अजूनही मी इथेच राहतो आहे. सर्व सोयीं इथे आहेत त्यामुळे आता तरी जागा बदलणार नाही . 

हा प्रवास सांगण्याचा हेतू इतकाच मी फार काही मोठं केलं अस माझं म्हणणं बिलकुल नाही. आलेल्या अडचणीतून जस सुचलं तसे मार्ग काढले , कदाचित यापेक्षाही सोपा मार्ग होता किंवा असेल , पण  मला तो नाही सुचला .....

माझ्या मुळे अनुजा , तिचे आई बाबा , माझी व तिची  बहिणी भावंड कधी कधी इतके घाबरून जायचे की बस ..... 


पण माझ्यापुढे तरी दुसरा पर्याय काय होता ....


यातून कुणाला प्रेरणा मिळाली तर अतिशय आनंद होईल ....

जेव्हा जेव्हा 7 नंबर मधील आम्ही सर्व 15 ऑगस्टच्या ट्रीपला जातो तेव्हा  "तू विरारची जागा कशी विकलीस, ठाण्याला कसा आलास आणि त्या टेम्पोतच रात्रभर सामान ठेऊन पुढे काय केलंस " ते जरा सांग बघू आम्हाला.... अस म्हणतात .


आणि शेवटी आम्ही तुम्हाला " उपरे"  म्हणालो म्हणून तुम्ही ब्लॉक घेतलेत नाहीतर राहिले असतात आमच्यासारखे अस म्हणून .....


चियर्स.....  !!

यानंतर मी घोडबंदर ह्या नवीन develop होत असलेल्या भागात दोन छोटी छोटी शॉप्स घेऊन तीही इच्छा पूर्ण केली. 

बघू पुढे काय मार्ग दिसतो ते......

.......  समाप्त ......

............ नंदा .......

माझी घर खरेदी... भाग २ ..

एक आठवण एक साठवण..

माझी घर खरेदी... भाग २ ..

अनुभव - शब्दांकन 

नंदा प्रभुदेसाई 

असा हा माझा आत्तापर्यंत चा तिसरा व बाळाचा पहिला प्रयत्न अक्षरशः तोंडघाशी पडता पडता आम्ही वाचलो होतो.

आम्ही दोघे रोज सकाळ - संध्याकाळ 7 नंबरच्या ग्राउंडवर Badminton व रिंग खेळायचो. त्यामुळे एक गोष्ट चांगली व्हायची म्हणजे आमच्या सगळ्या अपयशावर खेळ हा उतारा असायचा, अगदी काहीही घडलं तरी खेळाच्या या नादामुळे आम्हीं ते विसरून जायचो.

रिंग खेळताना आज लवकर थांबायचं हं आपणाला साईट बघायला जायचय कांदिवलीला अशी आपलीच खिल्ली उडवायचो ...

आता आमची दोघांचीही वय लग्न करण्या इतपत झाली होती पण आपल्याला घर नाही त्यामुळे आपल्याला कोणी मुलगी हो म्हणणं शक्य नाही अशी आमची खात्री झाली होती . त्यातच केलेले प्रयत्न जर कुणाला सांगावे तर तुम्हीच कर्मदरिद्री याशिवाय चांगली उपाधी आमच्यासाठी नव्हती .

आपण love marriage करायला पाहिजे होतं ,  असा पण विचार करून आम्ही पाहिला होता त्यावेळी. पण आपलं नशीब आणि दैव प्रत्येकवेळी आडवं यायचं.

असच एकदा पारल्याचे प्रसिद्ध बिल्डर्स परांजपे विरार ला जागा बांधतायत अस कळलं .

इतकेवेळा प्रयत्न करून सुदधा जरी जमलं नसलं तरी सुदधा पुन्हा पररांजपयाकडे जागेसाठी लाईन लावायला मी तयार. कारण नर्लज्जपणा, कोडगेपणा दुसरं काय !!


पण यावेळी builder चांगले असल्यामुळे  मी , श्री. भाउ हर्डीकर आणि रामानंद मधील बहुतेक जण परांजपयांच्या ऑफिस समोर लायनीत उभे होतो. पैसे 5000 भरून फक्त बुकिंग करायचं म्हणजे तस काम सोपं इतरांसाठी होतं, माझ्याकडे 5000 ची पण बोंब च होती. 
काहीतरी साठवगाठव केली , बॅँक अकाउंट बंद केलं व शेवटचे 100 रुपये पण घेतले आणि एकदाचे 5000 भरले. ती receipt चांगली प्लास्टिकच्या फोल्डर मध्ये घालून,आपल्याला कोणी बघत तर नाहीना अशावेळी पार्लेश्वराच्या देवळात जाऊन देवांसमोर  ठेवली व " बाबारे , आता तरी मला मदत कर " असं सांगितलं...


मी पहिल्याने मला Double रूम घ्यायला जमेल,  म्हणजे 25000 त काम होणार होतं....

पण नंतर राजामामा ने माझं बौद्धिक घेतलं व 1BHK , 55000 मध्ये घ्यायचं ठरलं. पाच हजारांचा हप्ता होता. 
आता बुकिंगनंतर allotment चा दिवस उजाडला. राजा मामाने सर्व जागांचा व्यवस्थित स्टडी करून कॉर्नरच्या जागा कोणत्या अस सगळं शॉर्टलिस्ट केलं होतं, श्री च्या नंतरचा नंबर माझा , त्यामुळे त्याने select करून झाल्यावर जी उरली ती मला, अशी ऑलॉटमेंट झाली.....

मध्यंतरी खूप उलाढाली झाल्या व 1987 साली अनंत प्रभुदेसाई 1 BHK जागेचे मालक झाले.

1978 ते 1987 या 10 वर्षात कीत्येक प्रयत्न मनस्ताप पचवून शेवटी एका जागेवर माझं नाव लागलं....

1988 साली माझं लग्न झालं व आम्ही विरारला राहायला आलो . अजूनही माझ्या नशिबाची थट्टा संपली नव्हतीच ....

अनुजाच ऑफिस CST ला , माझं अंधेरीला,  त्यामुळे ती दादरला गाडी बदलून जी  विरार गाडी पकडायची तीच मी अंधेरीला पकडायचो व विरारला पोचेपर्यंत आम्हाला ब्रह्मांड आठवायचं !!! ...

कसबस एक वर्ष आम्ही काढलं व विरारला राहणं शक्य नाही हे जाणवलं, त्यामुळे पुन्हा नव्या दमाने घर शोधण्याची मोहीम सुरू झाली . आता फरक इतकाच माझ्याबरोबर आणखी एक हक्काचा पार्टनर मिळाला ....

मधल्या काळात आपण विरारला एक दुकान घेऊया अस मी अनुजाला सांगीतल्यावर 
"ना आपल्याला रहायला धड घर आणि दुकान कसलं घेता "
आणि हा विषय इथेच थांबला .

1988 चा डिसेंबर महिना  उजाडला. ठाण्याला सद्गुरू सोसायटी मध्ये 1BHK जागा घ्यायचं आम्ही ठरवलं. किंमत 
रु. 250,000/- . आमचं saving रु. 20000/- होतं , आता हे सगळं कसं जमवायचं ?

यावेळी एक जमेचीबाजू म्हणजे विरारची जागा विकता येणार होती.पण ती घेणार कोण?  कारण सोसायटी च झाली नव्हती , त्यामुळे तेंही शक्य नव्हतं.


जे सर्व सामान्यांना सहज शक्य असतं ते मी करायला गेलो की त्यात अनेक भानगडी आणि नाना विघ्न उत्पन्न झाली नाहीत , अशी कोणतीच गोष्ट माझ्या नशिबी नव्हती....


आता मी पहिली नोकरी सोडून Raptakos Brett , वरळीला जॉईन झालो होतो. त्यामुळे नवीन नोकरी सांभाळणे आणि नवीन घर पण घेणे या कात्रीत सापडलो.

असलेल्या वीस पैकी दहा हजार देऊन जागा बुक केली आणि नवीन मनस्ताप विकत घेतला. 

आता loan घ्यायचं HDFC च , म्हणून वीरार ते वरळी ऑफिस , ते परेल HDFC आणि ठाणे  व परत घरी विरार , अशी अर्धी मुंबई पालथी घालणं सुरू झालं.
या वेळी दिलिप ने एक अतिशय चांगली गोष्ट केली म्हणजे HDFC मध्ये मोठ्या पोस्टवर असणाऱ्या रेखा व्यास ह्यांना लेटर लिहून मला मदत करण्यविषयी सांगितलं . 
आमचे दोघांचे पगार, LIC policies आणखी अस जे काय होतं ते सर्व pledge करून सुद्धा आम्हाला रु. 110000च लोन sanction झालं. रिपेमेंटचा विचार न करता आता उरलेले 140000 कसे जमवायचे हा एकच ध्यास होता.
जे देणारे होते त्याच्याकडून घेऊन सुद्धा भर पूरी होईना, व बिल्डरने तगादा लावला उरलेले पैसे भरा नाहीतर जागा मला दुसऱ्या पार्टीला  वीकावी लागेल . लोन सोडून बाकीचे पैसे देत नाही तोर्यंत agreement नाही , आणि agreement नसेल तर लोनची disbursement नाही , जी सॅन्गशन  झाल्यापासून 25 दिवसात घ्यायची होती. अशा वीचित्र परिस्थितीत सापडलो आणि काहीही सुचेना.

दैव खडतर होतं पण नशिबाने अजूनतरी पाठ फिरवली नव्हती.

एक दिवस Paranjape Builders च्या ऑफिस मधून कदम यांचा फोन आला व तुम्ही आत्ता लगेचच इथे या अस सांगितलं.


कदम म्हणाले तुम्हाला विरारची जागा विकायची आहे ना,  ती हे कुलकर्णी घ्यायला तयार आहेत . पण त्यांच्या काही अटी आहेत , त्या ते सांगतील...
कुलकर्णी म्हणाले ..

1) आत्ता लगेचच तुम्ही मला जागेच पझेशन दिल तर मी तुम्हाला रु. 40000 देईन.

2) एक महिन्यानंतर रु.35000 देईन.

3) उरलेले 35000 एक वर्षांनंतर देईन.

कदम (जयंत परांजपे यांच्या ऑफीसमधील स्टाफ ) म्हणाले सोसायटी registration यांच्या नावाने करण्याची जवाबदारी माझी. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती.मी ह्या proposal ला हो म्हणालो. पण हा व्यवहार जेव्हा माझे काका , दादा यांना सांगितला तेव्हा त्यांनी मला फक्त मूर्खात नाही काढलं तर तूझी जागा हा माणूस 40000 ना घेतोय , नंतरचा व्यवहार पूर्ण होईल याची काय खात्री ? ना तुला ही नवीन जागा मिळेल व विरारची घालवुन बसशील , लकशात ठेव ......

त्या सर्वांचं म्हणणं बरोबर होतं , मला पटतही होतं पण माझ्याकडेही दुसरा कोणताही पर्याय नव्हता .
 
मी घरी अनुजाला सांगितलं व आपण मोठी रिस्क घेतोय कदाचित रस्त्यावर येऊ , पण मला माझं मन सांगतंय आपण निभावून जाऊ , सांग तुला काय वाटतं....

"तुम्हाला करायचं आहे ना,  मग कुणालाही विचारत बसू नका , बघू काय नशिबात असेल ते  होईल .. .."

मी एक विचार केला कुलकरण्यांनी जरी 75000 दिले तरी आपण ही जागा घेऊ व नंतर एक वर्षानंतरचे 35000 नाही दिलें तर त्यावेळी जे सुचेल ते करू.

मी साधं गणित मांडलं आपल्याकडचे 20000 ,75000 कुलकर्णी देणार , 20000 पगार वगैरे जमा होईल  व 25000 दादा कडून घेऊ , झाले 140000 .

पुढंचया एक महिन्यात झोप येत नव्हती . मी ओळखीच्या खूप लोकांकडून एक महिन्याच्या बोलीने पैसे गोळा केले व बिल्डरला दिले. यथावकाश लोन चा चेक पण मिळाला तो बिल्डरला दिला तर म्हणे जोपर्यंत चेक वठत नाही तोर्यंत ताबा मिळणार नाही . मी कसं बस त्यांना पटवून दिलं, चेक HDFC चा आहे वगैरे ...
आणि ब्लॉकची किल्ली मिळवली.


December 1988 मध्ये 
सद्गुरू सोसायटी , बिल्डिंग H,  Block No 28  वर  
ANANT PRABHUDESAI  &
ANUJA PRABHUDESAI 
अशी पाटी दिमाखात झळकली होती .

ठरल्याप्रमाणे कुलकर्णी यांनी 75000 दिले ,  एका महिन्याच्या आत ज्याचे घेतले होते ते सर्व परत दिलें.
आशा प्रकारे आम्ही ठाण्यात प्रवेश केला.
  
हे घर विरारच्या मानाने खुप चांगलं होतं , अनुजासुदधा ठाणेकरच असल्यामुळे आमचा जम लवकरच बसला.

इथे मंडळी तुम्हाला सांगतो नन्तर परांजपे , स्थानिक लोक यांच्यांत विरारला काहीतरी लीगल इशू झाले व फेज 2 च प्रोजेक्ट वेळेवर झालं नाही .
ईथुन सगळ्यात पहिल्याने जागा विकून , तीसुद्धा इतक्या रिस्क घेऊन बाहेर पडणारा मी होतो . अजूनही लोकांचे पैसे इथे अडकलेले आहेत . बर मी कुलकर्णी याना फसवलं होत का ?  नाही !!!    इतकच काय एक वर्षा नंतरचे द्यायचे पैसे त्यांनी मला ठाण्याच्या घरी स्वतः आणून दिले व तुम्ही आम्हाला विश्वास ठेवून मदत केलीत म्हणून आमचं घर तरी झालं , अस सांगितलं. या 35000 पैकी , 5000 कुलकर्णीना आनंदाने परत दिले व आपणा दोघानाही गरज होती , तूम्ही खुश तर मीही खुश अस सांगितलं ...

1993 साल उजाडलं आणि अनुजा म्हणाली , मला BPCL मध्ये पाच वर्षं झाली त्यामुळे मला घर घेण्यासाठी लोन मिळेल.

आत्तापर्यंतचे अनुभव बघून मी म्हणालो आहे हे घर ठीक आहे, आपण HDFC च लोन परत करूया.

8-10 दिवस विचार करण्यातच घालवले .

.......... २ .....

......... क्रमशः .......

माझी घर खरेदी......... भाग १

माझी घर खरेदी......... भाग  १

अनुभव - शब्दांकन....

नंदा प्रभुदेसाई 

आपण प्रत्येकानेच खूप प्रयत्नपूर्वक मुंबई, पुणे किंवा अशाच शहरामध्ये घर घेतलं आहे. ते घेऊन झाल्यावर किंवा आपण त्या घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हाच आनंद केवळ अद्वितीय असतो. मला वाटतं घर खरेदी करताना जीतक्या समस्या , अडथळे जास्त तेवढे ते पार केल्यानंतरच समाधान जास्त !!!

तर माझी गोष्ट सुद्धा वेगळी नाही पण मला मात्र ती वेगळी वाटते, तस पण मी जे प्रयत्न केले ते अगदी वेगळे अस माझं म्हणणं नाही तर तो एक मूर्खपणा होता  आणि हा मूर्खपणा खुल्या दिलाने आपल्याच माणसांना सांगण्यात लाज कसली अस मला वाटतं आणि म्हणूच  हा सांगण्याचा प्रयत्न....

माझं शिक्षण म्हणजे college ला  मी डोंबीवलीला दादाकडे होतो. पहिलं वर्ष मुंबई पहाण्यात , कॉलेज समजून घेण्यात कस बस गेलं. 
आणि दुसऱ्या वर्षाचे 2 -3 महिने गेले आणि मला साडेसती सुरू झाली . आम्ही रमेश निवास ह्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर रहात होतो. अभ्यास करण्यासाठी गच्ची अतिशय चांगली होती माझा मुक्काम तिकडेच जास्ती असायचा. 
एकदिवस समोरच्याच मयूर सदन ह्या बिल्डिंगमध्ये गच्चीवर 4 रूम्स बांधताना मला दिसल्या , एकदम छोट्या म्हणजे आत एकच माणूस राहू शकेल एवढ्याच .मला घरात चैन पडेना म्हणून एक दिवस संगळ्याची नजर चुकवून मी मयूर सदनच्या गच्चीवर पोहोचलो आणि त्या बिल्डिंगचे मालक साठे यांना भेटलो . त्यांनी तू कोण वगैरे विचारल्यावर काहीतरी उत्तर दिले व त्या रूम ची त्यांनी मला माहिती दिली...

हे बघा त्या रूम्स नसून त्यातीथे 4 संडास बांधायचे आहेत. दोन पूर्ण झाले आहेत आणि आता माझा विचार बदललाय. 
दोन रूम मी विकणार आहे प्रत्येकी किंमत तीन हजार रुपये, पैकी एक वर्तक यांनी घेतलीय व एक शिल्लक आहे पण त्याच्या बाजूलाच संडास आहेत. किंमत फिक्स आहे , तुझ्याकडे पैसे असतीलतर पुन्हा इकडे ये नाहीतर तू जाऊ शकतोस,  मला बोलायला वेळ नाही....

साठे आपलाच ब्राह्मण माणूस खूपच सौजन्याने वागले , त्याकाळच्या घर आणि त्याच्या किंमतीचा आणि सर्वात म्हणजे माझ्यासारख्या कॉलेज मध्ये जाणाऱ्या,  ज्याच्या खिशात दमडी सुदधा असण शक्य नाही अशा माणसाला त्यांनी खूपच चांगलं , नेमकं आणि मोजक्या शब्दात सांगितलं मी घरी कसेबसे दोन दिवस घालवले व शोभाताई त्यावेळी ठाण्याला
 j k engineering ह्या कंपनीत नोकरी करीत होती तिला काहीही कर पण मला तीन हजार रुपये दे असा लकडा तिच्या मागे लावला.
 
" तुला पैसे कशासाठी हवेत " असे साधे सरळ प्रश्न विचारून मी दाद देत नाहीं म्हंटल्यावर व पैसे मागायचं सोडत नाही हे बघून , एक दिवस ती वैतागली व " तू कॉलेज मध्ये काही भानगड केलीस का ?".....

" कुणाकडून पैसे घेतलेत ते परत द्यायचे आहेत का ? .....
पण इतके? "

अस सगळं विचारून झालं व मी ह्यातलं काहीही केलेलं नाही असं सांगून तीच समाधान होईना  व मी पैसे कशासाठी ते तिला सांगत नव्हतो ....

एक दिवस ती ऑफिसमधून जरा  वैतागुन घरी आली आणि मी एकटा तिच्या तावडीत बरोबर सापडलो.
 
"नंदा, मला सांग तू काय भानगड केलीस ती, तुला पैसे कशासाठी हवेत ?"

प्रसंग गंभिर होता व आता रडारड होणार अस वाटून .....
"मला त्या समोरच्या बिल्डिंगमधली ती जागा घ्यायची आहे" मी 

"ती संडासाची जागा आहे आणि कसलीही असलीतरी माझ्याकडे इतके पैसे नाहीत, तुला काय वाटतं तुझि बहीण शेकड्यानी पैसे कमावते का ? ... पैसे नाहीत  ....मिळणार नाहीत... मुकाटपणि कॉलेज पूर्ण कर ...नोकरी कर मग काय करायचं ते कर .....नाहीतर गावला जा ...... आणि रहा तिकडेच ......."

उरलेली दोन वर्ष निमूटपणे कॉलेज पूर्ण केलं आणि शेवटच्या वर्षाचा result लागण्यापूर्वीच नोकरी पकडली .


दोन वर्ष इमाने इतबारे नोकरी केल्यावर जर मुंबईत रहायचं असेल तर आपलयाला एकतर घर घ्यावं लागेलं किंवा मुंबई सोडावी लागेल याविषयी माझी खात्री झाली. काय करावं ...
या वेळी दादा आणि कुटुंबीय लिबियाला होते. त्यामुळे मनातला हा विचार , माझा पगार , आणि एकूणच माझी परस्थिती न राहवून मी माझ्या एका मित्राला सांगितल्यावर त्याने अतिशय आपुलकीने मला सल्ला दिला... 

"पहिलं स्वतःच पोट भरायला शिक,  मग एखादी जागा भाड्याने घे कल्याण कर्जतच्या साईडला कुठेतरी ..."

माझ्या अवलक्षणी स्वप्नांवर त्याने सांगितलेला हा सल्ला एकदम प्रॅक्टिकलच होता याची मला लवकरच कल्पना यायला हवी होती ...
पण नाही दुसर्याने अनुभवपूर्वक सांगितलेली चांगली गोष्ट ऐकणं माझ्या नशिबी नव्हतं ....

काही दिवस गेल्यावर मी माझा विचार मधुमामाला डोंबिवलीला गेलो असताना सांगीतला . 
होय नाही होय नाही करीत मधुमामा आणि मी जागा बघायला निघालो .
 
पहिल्याने पूर्वी आम्ही डोंबीवलीला ज्या ठिकाणी रहात होतो त्या श्रीखंडे वाडी ह्या ठिकाणी एक बिल्डिंगचे काम चालू होतं तिथे पोहोचलो व डबल रूमची चौकशी केली. किंमत रुपये 35000 . 
मधुमामाने मला पगार विचारला तो होता रुपये 500 , आत्ता तुझ्याकडे किती पैसे तयार आहेत ?  तर 4 ते 5 हजारअसतील अस सांगितल्यावर  मामाने तिथूनच रस्त्यावरची रिक्षा  थांबवली व रिक्षाचे पैसे स्वतः देऊन मला डोंबिवली स्टेशनवर सोडलं . 
"नंदा , थोडे पैसे जमव मग बघू आपण काहीतरी "

असं सांगितलं ते मला खूपच आश्वासक वाटलं ......

तीन चार महिने सरळ गेले आणि माझा मित्र बाळा आणि मी घर याविषयी चर्चा करीत असू.
मी मामाकडे व तो त्याच्या आत्याकडे असे शेजारी शेजारी रहायचो परल्याला. आमचे रामानंद नंबर 7 मधील इतर सर्व मित्र त्याच्या स्वतःच्या घरी रहायचे . बाळामुळेच माझीही त्या सर्वांशी चांगली मैत्री झाली , बाळा तसा बोलायला थोडा फटकळ असल्यामुळे शाब्दिक भांडण ही असायचीच व आम्हाला गप्प करण्यासाठी ते आम्हाला *उपरे* म्हणायचे कारण आम्हाला घर नाही. 
मंडळी लक्षात घ्या ही आमची मित्र मंडळी अगदी जिवंशच कंठशच आजुनही आहेत . आमची आपापसातील बोलणी जेव्हा आमच्या बायका आता ऐकतात  तेव्हा..

 "तुम्ही त्यांना अस कांय हो बोलता ? ऐकणार्याला काय वाटेल ? "   

"आम्ही एकमेकांशी असच बोलतो "  अस सांगतो व तेच खरंही आहे. 

तर आम्ही दोघा उपऱ्यांनी मिळून घर घेण्यासाठी कोल डोंगरी ह्या ठिकाणी एक जाहिरात पाहिली व चौकशी करून,  पहिले सोसायटीचे सभासद होण्यासाठीचे 300 रुपये भरण्याच नक्की केलं .  
दोघेही घरी आलो 300 रुपये केवळ सभासद होण्यासाठी म्हणून जास्त वाटतात का ह्याच्यावर सविस्तर चर्चा दोघामध्येच केली . दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दोघे 
कोल डोंगरिला पोचलो तर तिथे भली मोठी पैसे भरण्याची लाईन पाहून  , आपण उगाचच उशीर केला अस वाटलं . लाईनितील लोक चेक बुक घेऊन आले होते कोण दहा ,पंधरा , पन्नास हजार देत होते. आंम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो . 
त्या बिल्डररचा एक माणूस तुम्ही किती , तुम्ही किती अस विचारत प्रत्येकाला वेगवेगळ्या counter वर पाठवत होता. 
आमची पाळी आल्यावर आम्हीच त्याला बाजूला घेतलं व सभासदत्वाचे , म्हणजे 300 रुपये भरण्यासाठी आम्ही आलोय अस समजल्यावर त्याने सरळ आम्हाला एका काउंटरवर नेलं व पाच मिनिटात पावती घेऊन आम्ही आलो . आता लाईनीतील इतर लोक 
"तुम्ही किती भरलेत हो ?" 
अस विचारायला लागल्यावर, त्यांच्याकडे न बघता आम्ही तीथुन निसटलो.

घरी आल्यावर आपणसुद्धा कमीत कमी 25 हजार तरी द्यायला हवे होतें अस वाटून , दोन तीन दिवसात  काहीतरी करूया असा निश्चिय केला.
येणारा रविवार जाऊन त्याच्या पुढच्या रविवारी बिल्डर साईट दाखवायला सगळ्यांना बसने घेऊन जाणार आहे असा बोर्ड लागलाय.

मी बाळाला बातमी दिली.
आपण 300 रुपये दिले असले तरी आपल्यालाही तो नेईल , मी विचारून आलोय, फ़क्त receipt बरोबर न्यायची. 
मी सांगितलं. पुढचे रविवार पर्यंतचे दिवस आम्ही कसे खुशीत काढले, आपली जागा कशी असेल, दोघानाही आपण बाजूबाजूलाच घेऊ, कांदिवली म्हणजे बोरीवलीपेक्षाही जवळच ना ... अस स्वप्न बघत ,रोज याच्यावर थोडं डिस्कशन करूनच झोपत होतो. 
शनिवार उजाडला , उद्या सकाळी लवकरच जाऊ, पहिल्या बसनेच आपण साईट बघू , अस ठरवुन रविवारी सकाळी 8 वाजताच तिथे आम्ही पोचलो.  साधारण 9 पासून लोक येत होते व कोणी 10 , 15, 25 हजार भरले होते त्याप्रमाणे रांगेत उभे होते , आमची दोघांचीच रांग , आमचया रांगेत कोणी नाही... एकजण आला तर तू कीती भरलेस अस विचारून आम्हीच त्याची रांग त्याला दाखवली , उगाच आपलं हसू नको व्हायला म्हणून ....

मंडळी 9.30 झाले , 10 वाजले  तशी थोडी चुळबुळ सुरू झाली.
आता 11 वाजले तरी ते ऑफिस काही उघडेना ..
शेवटी 2 - 3 जण बाजूच्या ऑफमध्ये चौकशी करण्यासाठी गेले आणि अर्ध्या तासाने परत आले आणि एकच गोंधळ झाला. आम्हालाही समजेना काय झालं ते; प्रत्येकजण तुम्ही किति दिले , तुम्ही किती अस एकमेकाला विचारत होते. काही बायका तर रडत पण होत्या.

"च्यायला काय झालं रे !!
तो .....चा ड्राइवर वेळेवर आला नसेल बसचा.....
बायकांना काय रडण्याशिवाय दुसरं काय येतंय ...." बाळा
........

आम्ही दोघे पुढे गेलो आणि काय झालय ते समजल्यावर आता रडायची पाळी आमची होती ...... 

त्या बिल्डरने हे office सहा महिन्यांपूर्वी भाडयाने घेतलं होतं आणि 2 - 3 दिवसांपूर्वीच शटर बंद करून पसार झाला होता व पोलीस त्याच्या शोधावर होते , ही बातमी त्या शेजरच्यांनी दिली होती. झालं आम्ही दोघेही 300 रुयांवरच निभावल अस समजून घर घेणं आपल्या बसच काम नाही असा निर्धार करून , एक कप चहा दोघात टपरीवर प्यायलो व शांत चित्ताने घरी आलो.

.......क्रमशः .....

...........  2  .........