माझी घर खरेदी......... भाग १
अनुभव - शब्दांकन....
नंदा प्रभुदेसाई
आपण प्रत्येकानेच खूप प्रयत्नपूर्वक मुंबई, पुणे किंवा अशाच शहरामध्ये घर घेतलं आहे. ते घेऊन झाल्यावर किंवा आपण त्या घरामध्ये जेव्हा प्रवेश करतो तेव्हाच आनंद केवळ अद्वितीय असतो. मला वाटतं घर खरेदी करताना जीतक्या समस्या , अडथळे जास्त तेवढे ते पार केल्यानंतरच समाधान जास्त !!!
तर माझी गोष्ट सुद्धा वेगळी नाही पण मला मात्र ती वेगळी वाटते, तस पण मी जे प्रयत्न केले ते अगदी वेगळे अस माझं म्हणणं नाही तर तो एक मूर्खपणा होता आणि हा मूर्खपणा खुल्या दिलाने आपल्याच माणसांना सांगण्यात लाज कसली अस मला वाटतं आणि म्हणूच हा सांगण्याचा प्रयत्न....
माझं शिक्षण म्हणजे college ला मी डोंबीवलीला दादाकडे होतो. पहिलं वर्ष मुंबई पहाण्यात , कॉलेज समजून घेण्यात कस बस गेलं.
आणि दुसऱ्या वर्षाचे 2 -3 महिने गेले आणि मला साडेसती सुरू झाली . आम्ही रमेश निवास ह्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर रहात होतो. अभ्यास करण्यासाठी गच्ची अतिशय चांगली होती माझा मुक्काम तिकडेच जास्ती असायचा.
एकदिवस समोरच्याच मयूर सदन ह्या बिल्डिंगमध्ये गच्चीवर 4 रूम्स बांधताना मला दिसल्या , एकदम छोट्या म्हणजे आत एकच माणूस राहू शकेल एवढ्याच .मला घरात चैन पडेना म्हणून एक दिवस संगळ्याची नजर चुकवून मी मयूर सदनच्या गच्चीवर पोहोचलो आणि त्या बिल्डिंगचे मालक साठे यांना भेटलो . त्यांनी तू कोण वगैरे विचारल्यावर काहीतरी उत्तर दिले व त्या रूम ची त्यांनी मला माहिती दिली...
हे बघा त्या रूम्स नसून त्यातीथे 4 संडास बांधायचे आहेत. दोन पूर्ण झाले आहेत आणि आता माझा विचार बदललाय.
दोन रूम मी विकणार आहे प्रत्येकी किंमत तीन हजार रुपये, पैकी एक वर्तक यांनी घेतलीय व एक शिल्लक आहे पण त्याच्या बाजूलाच संडास आहेत. किंमत फिक्स आहे , तुझ्याकडे पैसे असतीलतर पुन्हा इकडे ये नाहीतर तू जाऊ शकतोस, मला बोलायला वेळ नाही....
साठे आपलाच ब्राह्मण माणूस खूपच सौजन्याने वागले , त्याकाळच्या घर आणि त्याच्या किंमतीचा आणि सर्वात म्हणजे माझ्यासारख्या कॉलेज मध्ये जाणाऱ्या, ज्याच्या खिशात दमडी सुदधा असण शक्य नाही अशा माणसाला त्यांनी खूपच चांगलं , नेमकं आणि मोजक्या शब्दात सांगितलं मी घरी कसेबसे दोन दिवस घालवले व शोभाताई त्यावेळी ठाण्याला
j k engineering ह्या कंपनीत नोकरी करीत होती तिला काहीही कर पण मला तीन हजार रुपये दे असा लकडा तिच्या मागे लावला.
" तुला पैसे कशासाठी हवेत " असे साधे सरळ प्रश्न विचारून मी दाद देत नाहीं म्हंटल्यावर व पैसे मागायचं सोडत नाही हे बघून , एक दिवस ती वैतागली व " तू कॉलेज मध्ये काही भानगड केलीस का ?".....
" कुणाकडून पैसे घेतलेत ते परत द्यायचे आहेत का ? .....
पण इतके? "
अस सगळं विचारून झालं व मी ह्यातलं काहीही केलेलं नाही असं सांगून तीच समाधान होईना व मी पैसे कशासाठी ते तिला सांगत नव्हतो ....
एक दिवस ती ऑफिसमधून जरा वैतागुन घरी आली आणि मी एकटा तिच्या तावडीत बरोबर सापडलो.
"नंदा, मला सांग तू काय भानगड केलीस ती, तुला पैसे कशासाठी हवेत ?"
प्रसंग गंभिर होता व आता रडारड होणार अस वाटून .....
"मला त्या समोरच्या बिल्डिंगमधली ती जागा घ्यायची आहे" मी
"ती संडासाची जागा आहे आणि कसलीही असलीतरी माझ्याकडे इतके पैसे नाहीत, तुला काय वाटतं तुझि बहीण शेकड्यानी पैसे कमावते का ? ... पैसे नाहीत ....मिळणार नाहीत... मुकाटपणि कॉलेज पूर्ण कर ...नोकरी कर मग काय करायचं ते कर .....नाहीतर गावला जा ...... आणि रहा तिकडेच ......."
उरलेली दोन वर्ष निमूटपणे कॉलेज पूर्ण केलं आणि शेवटच्या वर्षाचा result लागण्यापूर्वीच नोकरी पकडली .
दोन वर्ष इमाने इतबारे नोकरी केल्यावर जर मुंबईत रहायचं असेल तर आपलयाला एकतर घर घ्यावं लागेलं किंवा मुंबई सोडावी लागेल याविषयी माझी खात्री झाली. काय करावं ...
या वेळी दादा आणि कुटुंबीय लिबियाला होते. त्यामुळे मनातला हा विचार , माझा पगार , आणि एकूणच माझी परस्थिती न राहवून मी माझ्या एका मित्राला सांगितल्यावर त्याने अतिशय आपुलकीने मला सल्ला दिला...
"पहिलं स्वतःच पोट भरायला शिक, मग एखादी जागा भाड्याने घे कल्याण कर्जतच्या साईडला कुठेतरी ..."
माझ्या अवलक्षणी स्वप्नांवर त्याने सांगितलेला हा सल्ला एकदम प्रॅक्टिकलच होता याची मला लवकरच कल्पना यायला हवी होती ...
पण नाही दुसर्याने अनुभवपूर्वक सांगितलेली चांगली गोष्ट ऐकणं माझ्या नशिबी नव्हतं ....
काही दिवस गेल्यावर मी माझा विचार मधुमामाला डोंबिवलीला गेलो असताना सांगीतला .
होय नाही होय नाही करीत मधुमामा आणि मी जागा बघायला निघालो .
पहिल्याने पूर्वी आम्ही डोंबीवलीला ज्या ठिकाणी रहात होतो त्या श्रीखंडे वाडी ह्या ठिकाणी एक बिल्डिंगचे काम चालू होतं तिथे पोहोचलो व डबल रूमची चौकशी केली. किंमत रुपये 35000 .
मधुमामाने मला पगार विचारला तो होता रुपये 500 , आत्ता तुझ्याकडे किती पैसे तयार आहेत ? तर 4 ते 5 हजारअसतील अस सांगितल्यावर मामाने तिथूनच रस्त्यावरची रिक्षा थांबवली व रिक्षाचे पैसे स्वतः देऊन मला डोंबिवली स्टेशनवर सोडलं .
"नंदा , थोडे पैसे जमव मग बघू आपण काहीतरी "
असं सांगितलं ते मला खूपच आश्वासक वाटलं ......
तीन चार महिने सरळ गेले आणि माझा मित्र बाळा आणि मी घर याविषयी चर्चा करीत असू.
मी मामाकडे व तो त्याच्या आत्याकडे असे शेजारी शेजारी रहायचो परल्याला. आमचे रामानंद नंबर 7 मधील इतर सर्व मित्र त्याच्या स्वतःच्या घरी रहायचे . बाळामुळेच माझीही त्या सर्वांशी चांगली मैत्री झाली , बाळा तसा बोलायला थोडा फटकळ असल्यामुळे शाब्दिक भांडण ही असायचीच व आम्हाला गप्प करण्यासाठी ते आम्हाला *उपरे* म्हणायचे कारण आम्हाला घर नाही.
मंडळी लक्षात घ्या ही आमची मित्र मंडळी अगदी जिवंशच कंठशच आजुनही आहेत . आमची आपापसातील बोलणी जेव्हा आमच्या बायका आता ऐकतात तेव्हा..
"तुम्ही त्यांना अस कांय हो बोलता ? ऐकणार्याला काय वाटेल ? "
"आम्ही एकमेकांशी असच बोलतो " अस सांगतो व तेच खरंही आहे.
तर आम्ही दोघा उपऱ्यांनी मिळून घर घेण्यासाठी कोल डोंगरी ह्या ठिकाणी एक जाहिरात पाहिली व चौकशी करून, पहिले सोसायटीचे सभासद होण्यासाठीचे 300 रुपये भरण्याच नक्की केलं .
दोघेही घरी आलो 300 रुपये केवळ सभासद होण्यासाठी म्हणून जास्त वाटतात का ह्याच्यावर सविस्तर चर्चा दोघामध्येच केली . दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दोघे
कोल डोंगरिला पोचलो तर तिथे भली मोठी पैसे भरण्याची लाईन पाहून , आपण उगाचच उशीर केला अस वाटलं . लाईनितील लोक चेक बुक घेऊन आले होते कोण दहा ,पंधरा , पन्नास हजार देत होते. आंम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो .
त्या बिल्डररचा एक माणूस तुम्ही किती , तुम्ही किती अस विचारत प्रत्येकाला वेगवेगळ्या counter वर पाठवत होता.
आमची पाळी आल्यावर आम्हीच त्याला बाजूला घेतलं व सभासदत्वाचे , म्हणजे 300 रुपये भरण्यासाठी आम्ही आलोय अस समजल्यावर त्याने सरळ आम्हाला एका काउंटरवर नेलं व पाच मिनिटात पावती घेऊन आम्ही आलो . आता लाईनीतील इतर लोक
"तुम्ही किती भरलेत हो ?"
अस विचारायला लागल्यावर, त्यांच्याकडे न बघता आम्ही तीथुन निसटलो.
घरी आल्यावर आपणसुद्धा कमीत कमी 25 हजार तरी द्यायला हवे होतें अस वाटून , दोन तीन दिवसात काहीतरी करूया असा निश्चिय केला.
येणारा रविवार जाऊन त्याच्या पुढच्या रविवारी बिल्डर साईट दाखवायला सगळ्यांना बसने घेऊन जाणार आहे असा बोर्ड लागलाय.
मी बाळाला बातमी दिली.
आपण 300 रुपये दिले असले तरी आपल्यालाही तो नेईल , मी विचारून आलोय, फ़क्त receipt बरोबर न्यायची.
मी सांगितलं. पुढचे रविवार पर्यंतचे दिवस आम्ही कसे खुशीत काढले, आपली जागा कशी असेल, दोघानाही आपण बाजूबाजूलाच घेऊ, कांदिवली म्हणजे बोरीवलीपेक्षाही जवळच ना ... अस स्वप्न बघत ,रोज याच्यावर थोडं डिस्कशन करूनच झोपत होतो.
शनिवार उजाडला , उद्या सकाळी लवकरच जाऊ, पहिल्या बसनेच आपण साईट बघू , अस ठरवुन रविवारी सकाळी 8 वाजताच तिथे आम्ही पोचलो. साधारण 9 पासून लोक येत होते व कोणी 10 , 15, 25 हजार भरले होते त्याप्रमाणे रांगेत उभे होते , आमची दोघांचीच रांग , आमचया रांगेत कोणी नाही... एकजण आला तर तू कीती भरलेस अस विचारून आम्हीच त्याची रांग त्याला दाखवली , उगाच आपलं हसू नको व्हायला म्हणून ....
मंडळी 9.30 झाले , 10 वाजले तशी थोडी चुळबुळ सुरू झाली.
आता 11 वाजले तरी ते ऑफिस काही उघडेना ..
शेवटी 2 - 3 जण बाजूच्या ऑफमध्ये चौकशी करण्यासाठी गेले आणि अर्ध्या तासाने परत आले आणि एकच गोंधळ झाला. आम्हालाही समजेना काय झालं ते; प्रत्येकजण तुम्ही किति दिले , तुम्ही किती अस एकमेकाला विचारत होते. काही बायका तर रडत पण होत्या.
"च्यायला काय झालं रे !!
तो .....चा ड्राइवर वेळेवर आला नसेल बसचा.....
बायकांना काय रडण्याशिवाय दुसरं काय येतंय ...." बाळा
........
आम्ही दोघे पुढे गेलो आणि काय झालय ते समजल्यावर आता रडायची पाळी आमची होती ......
त्या बिल्डरने हे office सहा महिन्यांपूर्वी भाडयाने घेतलं होतं आणि 2 - 3 दिवसांपूर्वीच शटर बंद करून पसार झाला होता व पोलीस त्याच्या शोधावर होते , ही बातमी त्या शेजरच्यांनी दिली होती. झालं आम्ही दोघेही 300 रुयांवरच निभावल अस समजून घर घेणं आपल्या बसच काम नाही असा निर्धार करून , एक कप चहा दोघात टपरीवर प्यायलो व शांत चित्ताने घरी आलो.
.......क्रमशः .....
........... 2 .........
No comments:
Post a Comment