Monday, 30 September 2019

अनंताची पूजा आणि तो सोंगट्टयाचा डाव..….

*अनंताची पूजा आणि तो सोंगट्टयाचा डाव..….*

आपल्या घरी होत असलेल्या अg gfनंत पूजेचा वारसा खूप मोठा आहे. ही पूजा म्हणजे एक सोहळाच आहे.
यानिमित्याने गावातील लोक आपल्या घरी होणारी भाजी म्हणजे पडवळ, भोपळा, काकडी अस काहीही आनंदने प्रसाद म्हणून आणून देत असत, तर काही वेगवेगळी फुल, पत्री, कमळ अस जे शक्य असेल ते आणून देत.

पूजेला भाऊ  व मामी बसायचे. नाना सप्रे यथासांग पूजा सांगायचे.अंबुताई म्हणजे नानांच्या सौ , सवाष्ण व जेवणासाठी मामीला मदत म्हणून अगदी सकाळपासूनच हजर असायच्या .
घरातील 25 -30 माणसं, 4-5 गडी, फुलं - भाजी आणून दिलेलें, आयत्या वेळी प्रसादासाठी आलेले असे सुमारे 80 -90 लोक जेवायला सहज असायचे.
अनंत पूजेसाठी लागणारे 14 प्रकारच्या भाज्या, कोशिंबरी तर असायचाच शिवाय वडे , घारगे व मोदक असायचे. जेवणावळी (पंगती ) समपेपर्यंत संध्याकाळचे 5 वाजयचे.
आमचया गणपतीचं विसर्जन अंनंताच्या दुसऱ्या दिवशी व्हायचं.

नंतर रात्रीची तयारी . रात्री गावातील सर्व ब्राह्मण मंडळींला आरत्या म्हणण्यासाठी बोलावल जायचं. आरत्या म्हणणारे एक्स्पर्ट आवर्जून आजू बाजूच्या गावातून यायचे.
बाळ्याकाका काय माणूस हो .... एकदम प्रसन्न व हसरा चेहरा .... त्यातच त्यांनी तंबाखू , चुना , कात,  सुपारीच पान खाल्ल की तोंड एकदम लाले लाल व्हायचं , व चेहरा आणखीनच खुलून दिसायचा. ढोलकी अशी वाजवत की बाजूचा चकवा (मोठ्या झान्जा) वाजवणार्या माणसाचा ठोका चुकला तर ढोलकी वाजवण्याच्या काठीचा फटका तुमच्या हातावर बसला म्हणून समजा...
"आरत्या म्हणताना बाळ्या काकांची मी साथ केलीय "  अस काही लोक अभिमानाने सांगायचे ....
मंडळी जेव्हा मी या बाळ्याकाकाना पाहिलं तेंव्हा त्यांचं वय 78 ते 80   असावं. मस्त गोरे गोरे आजोबा, चेहरा हास्याने एकदम फुललेला ,  स्वच्छ धोतर, अंगात बंडी व त्यावर निळ्या रंगाच जाकीट.
आरत्या म्हणणारया काही लोकांची वैशिष्ट्य अशी...
शांताराम अण्णा झान्जा वाजवणार, सगळ्यांना सांभाळून घेणार.
हरिभाऊ व बापुकाका पत्की ढोलकी वजवणार. बापुकाका थोडेसे मिस्कील स्वभावाचे .
"शीरुकाका ची आरत्या म्हणण्याची हौस दाणगी पण उभं राहून राहून माझे पाय तुटले , म्हटलं याला आता कुणीतरी आवरा "
अस म्हणायचे ...
हरिभाऊ व रघुभाऊ नवीन नवीन आरत्या म्हणणार ...
बाळ्याकाकाआजोबांना अजिबात ऐकू येत नसे पण हे इतके हौशी की कोठरातल्या आर्त्यांना आंब्यातून (गवाच नाव) याययाचेच. 80 वर्षाचे आजोबा 4 तास ढोलकी वाजवत उभे राहायचे. सर्व आरत्या त्यांना तोंड पाठ होत्या.
गंमत म्हणजे एकदा आरतीची सुरवात त्यांच्या कानात सांगितली (ऐकू येत नव्हतं ना) की संपूर्ण आरती आणि ढोलकी एकदम सुरात म्हणायचे आणि वाजवायचे .
कोठारात आरत्या जितक्या रंगतात तितक्या इतर कुठेच रंगत नाहींत अस लोक म्हणायचे व याचा सर्व कोठरवाल्याना अभिमान वाटावा ....
आरत्या झाल्यावर पोहे  व कॉफी दिली जायची .
मंडळी त्या रात्रीच्या कॉफी ची चव अजूनही मी विसरलो नाहीये. मस्त जायफळ घालून आटवलेली कॉफी ....

आरत्या झाल्यावर सोंगट्या चा खेळ रंगायचा.
मांडवी विषयीं मी मागच्या एका लेखात लिहिलं आहेच .
तर या मांडवीत खेळल्या गेलेल्या सोंगट्या च्या एका डावा विषयी आता तुम्हाला ऐकवतोच ...

कोठारात न भूतो न भविष्यती असा तो खेळ त्यावर्षी खेळला गेला...

आनंतचतुर्दशीची ती रात्र. पाऊस थोडा फार पडत होता.. रात्रीचे 2 - 2.30 वाजले असतील आणि मांडवीत जाजम (मोठी सतरंजी) घातलं गेलं , सोंगट्या चा पट मांडला गेला , मधोमध बत्ती (petromax) ठेवली गेली आणि प्रत्येक बाजूचे 12 जण असे एकूण 48 गडी खेळायला बसले .
काय माहोल होता, यजमान (प्रभुदेसाई) पूर्व पश्चिम , घुगरे - सप्रे उत्तर दक्षिण , दान लावणारे बंडूकाका पिवळ्या सोंगट्या घेऊन तर त्यांचेच प्रतिस्पर्धी हरिभाऊनि काळ्या सोंगट्या घेतल्या.
प्रभुदेसाई सप्रे हिरव्या आणि तांबड्या सोंगट्या घेऊन खेळाला सुरवात झाली

हस्तिदंती पांढरे शुभ्र फासे, एकावर एक घासून  असे टाकले जायचे की त्याचा कडकडाट व्हायचा व तो आवाजच त्या रात्री भयांण वाटायचा.
मंडळी लक्षात घ्या , 48 लोक खेळत होते , केवढा  मस्त माहोल असेल ना ??
यामध्ये अगदी 80 वर्ष वय असलेल्या म्हातारयांपासून , 60 -70 वय असलेले सर्वजण होते. 48 खेळाडूंनी खेळला जाणारा हा एकमेव खेळ असावा.

मंडळी बडूकाकांविषयी आणि त्यांच्या सोंगट्याच्या खेळाच्या वेडा विषयी काय सांगावं. घरीं हा माणूस पट मांडायचा आणि चारही बाजुनी एकटाच खेळायचा ...
यजमानांपासून सुरवात म्हणून भाऊंनी फासे हातात घेतले आणि मनापासून डाव्या कानाजवळ नेऊन आवाज करून टाकले. एकच आरोळी उठली आणि आता यजमानांनी सुरवात तर केलीच आहे तर आता कोण जिंकतो बघूया, अशी आरोळी उठली. पटावरच्या दोन सोंगट्या बाहेर आल्या
अजून 11 जण खेळायचे बाकी होतें.
जर सगळ्या सोंगट्या बाहेर आल्या व सम्पूर्ण पट फिरून घरात (home) गेल्या तर खेळच संपला ...
पण तसं व्हायचं नव्हतं...
पुढच्या बाजूच्या पार्टीकडे आता फासे गेले ज्यात बंडूकाका एकपाय दुमडून बसले होते. त्यांनी पहिल्या भिडूच्या  पाठीत धपाटा घातला आणि ओरडले "आठ पाहिजेत , उठून बस ,  फासे टाक... तू बोलशील तस दान फासा देईल ... सगळ्या सोगट्या बाहेर हव्यात माझ्या... आज ह्या सगळ्यांना दखवतोच , सोंगट्टयाचा डाव मीच जिंकणार " झालंही तसच ... पहिल्या 2 सोंगट्या ज्या यजमानांनी बाहेर काढला होत्या त्या बंडूकाकांनी मारल्या व आपल्या तीन सोंगट्याना चाल देऊन , पुढच्या भिडूना फासे दिले.

मंडळी लक्षात घ्या 48 जण खेळतायत पण पटावर फक्त 3 सोंगट्या..

आता सोंगट्याचे माहीर  रघुकाकांच्या हातात फासे होते . त्यांनी त्यांचा इरादा सांगितला .... "अरे नाना बघतोस काय ..घे फासे आणि बोल 6 ... 8  आणि सक्रे सात ( एका फॅशयावर 6 व दुसऱ्यावर 1 रेजा , याला अस म्हणण्याची पद्धत) हवेत ...अरे ह्या बंड्याच्या तिन्ही सोंगट्या मारून , माझ्या दोन ना चाल नाही दिली तर साला पुन्हा सोंगट्या ना हात नाही लावणार ....
आतापर्यंत शांतपणे चालणारा खेळ हळू हळू रंगू लागला व वातावरण तापू ही लागलं ....
रघुभाऊच्या भिडूना हवं तसं दान पडलं आणि फासे रघुभाउंकडे आले.
त्यांनी एकदा फासे निरखले , बंडूभाऊंकडे रागाने तीरपी नजर टाकली , आणि फासे असे काय कानाजवळ नेऊन एकमेकांवर घासले की त्या फाशांचा येणारा आवाजच चमत्कारिक वाटला.
त्यांनी सकरे सात हवेत म्हणून फासे फेकले आणि सात पडताच बंडूकाकांच्या तीन्ही सोगट्या अशा काय बसल्या जागेवरूनच हणल्या की बंडूकाकांच्या अंगाचा तिळपापड झाला.
मंडळी 48 जण खेळतायत , आरडा ओरडा, एकमेकांच्या कुरापती इतक्या शिगेला पोचल्या की ज्याचे नाव ते ...
थोडं बांडूकाकां ह्या माणसा विषयी सांगितलंच पाहिजे..
बंडूकाका म्हणजे काय तगडा माणूस  !!!
नाश्त्याला नाचणीच्या चार भाकरी , प्रत्येकी दोन भकरींच्या मध्ये लसणिच्या लाल तिखटाचा थर व वरती 200 ml शेंगडण्याच तेल फस्त करणारा हा माणूस..

" रघु , एकदा फासे माझ्याकडे येउ देत , तुम्हा सगळ्यांच्या सोंगट्या पटाबाहेर नाही काढल्या तर ह्या कोठरवाल्यांकडे शपथ घेतो की पुनः सोंगट्या हा विषय बंद..."
बंडूकाका
"अरे बंड्या , फुकट हवेत बार नको काढुस ,फासा बोलले पाहिजे फासा...." रघुभाऊ
आता वातावरण खेळ बाजूला राहून चिघळायला लागलं!!!
पण असं नाही झालं तर खेळ पण रंगत  नाही ...
आता फासे बंडूकाकांच्या पार्टीकडे होते . पहिल्या दोघा तिघांना म्हणावं तस दान न पडल्यामुळे बंदुकाकांचा पारा चढला ,  त्यांनी फाशांना आपल्या मस्तकी लावलं आणि जोरजोरात कडकडाट करीत फासे टाकले .. आणि 8 घेतले..
पुन्हा  6 पडले ,
"हरी बघतोस काय उडव त्या सोंगट्या , आणि बोल किती हवेत , ह्या रघुची एकही सोंगटी मला पटावर दिसता कामा नये"

"अरे हे फासे काय तुझ्या रक्तात बुडवलेत काय "
इति रघुभाऊ
"तसं समज हवं तर पण आता बघच फासा काय बोलतो ते ..."
अस म्हणून बंडूभाऊनी फासे टाकले मात्र आणि काय आश्चर्य एक फासा चक्क उभा राहिला ....
बंडूभाऊनी एक सोंगटी हातात घेऊन फेकून रघुभाऊंच्या सोंगटीवर मारली,  दुसरी घेतली आणि "अरे हरी , हांण ती सोंगटी... रघुच्या सगळ्या सोंगट्या मार ....
असं म्हणणार तोच

" कशी मारतोस तेच बघतो, मला कस दान लावलंस ते आधी सांग " रघुकाका

"अरे रघु , माझा फासा उभा राहिलाय , म्हणजे त्याच्या चारही बाजूचं सगळं दान, 4 & 6 आहेत म्हणून मला पुन्हा खेळायचा अधिकार आहेच " अस म्हणून बंडूभाऊनू सोंगटी बसल्या जागेवरूनच  फेकून मारली आणि दोघेही हमरा तुंमरीवर आले आणि दोघानीही  एकमेकांच्या गच्यांड्या पकडल्या...
एकच गोंधळ झाला , काहींनी मजा चालली आहे समजून दोन्ही पार्टीच्या इतर खेळाडूंनी एकमेकांशी मोठ मोठ्याने ओरडून झोंबा झोंबी सुरू केली ,  फेकून मारलेली सोंगटी बत्तीला (petromax) लागली आणि तिची काच फुटली व कळोंख झाला... एकच आरडा ओरडा झाला... घरातील सर्व बायका, मुलं भांडणाच्या आवाजाने मांडवीत धावली ,  कारण काय झालं तेच नीट समजेना.

रात्रींचे तेव्हा 4 वाजले होतें... ह्या दोघांना काळोखात आवरताना कुणालाच काही समजेना ...
भांडणाचा आवाज एवढा मोठा की कोठरवाल्यांच्या दुकानावर दरोडा पडला समजून शेजारचे लोक हातात मिळेलं ते घेऊन धावून आले ...
हे 50 लोक आणि इतर गावातले 100 लोक हातात काठ्या वगैरे घेईन धावले व मांडवीत जीथे खेळ चालला होता तिथे काचाच काचा व काळोख ... कुणालाही काही समजेना... एकच हल कल्लोळ झाला....

गडबडीत चोर समजून कुणालातरी मार पडला तर काय करायचं ...
अशी परिस्थिती..

शेवटी भाऊनि सर्वाना मोठ्या आवाजात काहीही झालेलं नाहीये .  अस सांगून कस बस आवरलं .
तोपर्यंत सकाळचे 5   5.30 वाजले होते . चक्क उजाडलं होतं

सर्वाना स्थिर स्थावर करेपर्यंत सकाळचे 6 वाजले ....

भाऊंनी सर्वांना चहा घ्या म्हणून सांगितलं .

150 -200 कप चहा मामीने केला व सर्वाना दिला ...

" बामन काय खेळतत त्ये हमका समाजल बारी नाय "
अस म्हणून लोक आपल्या घरी निघुन गेले.

मंडळी,  भाऊंनी बंडूकाका व राघूभाऊना जवळ बोलावलं , एकमेकांचा हात हातात दिला, व बाबानो हा खेळ होता , बर झालं काय बर वाइट झाल नाही असं म्हणून हा न भूतो न भविष्यती आशा खेळाची सांगता केली ....

मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनंताच्या रात्री आपल्या घरी असाच सोंगट्याचा खेळ रंगत आलाय ...

उगाच नाही लोक म्हणतात सोंगट्या खेळायच्या तर त्या फक्त कोठारातच, ती मजा इतर कुठेही येण शक्य नाही....

आता 25 ते 30 वर्षानी आपण सर्वांनी प्रेत्येकाच्या घरी गणपती आणायचं ठरवलंय ....
त्यातच तळवड्याचा नंबर पण लागू शकतो....
तर पुन्हा एकदा मांडायचा का सोंगट्याचा पट.....

अनंत प्रभुदेसाई.

Sunday, 29 September 2019

आणि भरल्या नदीत त्यांनी उडी घेतली

*आणि भरल्या नदीत त्यांनी उडी घेतली*

मंडळी अशीच आणखीन एक गोष्ट !!!
कोकणातला पाऊस ज्यांनी अनुभवला असेल त्यांना हे नवीन नाही !!!
पहिला पाऊस असा काय येतो की बस !!! तीन चार दिवस अगदी  सगळं झोडपुन काढतो ,  नदी , वहाळ (ओढे ) सगळं काठोकाठ भरून वहायला लागतात !!

असच एक वर्षी विजुताई , शोभाताई मे महिन्यात गावाला आल्या होत्या . त्यांची सुटी आता संपली होती व जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यांना मुंबईला जायचंच होतं.
जूनच्या 1 - 2 तारखेच ST च तिकीट चांगलं 15 दिवस अगोदर त्यांनी reserv केलं होतं !!
मे महिन्याची 29   30  तारीख होती आणि दुपार नंतचा माहोल एकदम बदलला आणि विजांचा जबरदस्त कडकडाट होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली !!
संध्याकाळी पाऊस कमी होईल हा अंदाज साफ चुकला आणि रात्रभर पावसाने थैमान घातले !!
आमच्या घरासमोरील वहाळ कठोकाठ भरून वहायला लागला!!

ताई व शोभाताईच्या तिकीटाचा दिवस जसा जवळ येत होता तस ह्या दोघींचे चेहरे काळवंडायला लागले !!
त्यांना  ST ने जायचं म्हणजे तळवडे व पाचल मधील नदी पार करून जायला हवी .

नदीला साकव (लाकडी पूल ) नव्हताच तर पूल अगदी मी SSC ला होतो त्यावर्षी  म्हणजे 1975 साली झाला .तोपर्यंत शाळेत जाणाऱ्या सर्व मुलींना सकाळी व संध्याकाळी नदी पार करून देणारे पट्टीचे वाहत्या पाण्यात पोहोणारे लोक स्वतःहून हजर असत .
त्यापैकी बबू चवंडे ,(उत्तम पोहणारा पण याला फिट्स यायची ) त्याचाच भाऊ रम्या (पूर्ण नाव मला आजही माहीत नाही ) , कुंमटेकर, तळवड्यातले म्हदेवशेठ  & मधूशेठ कासार म्हणजे यांच घर आणि जन्मच नदीकाठचा म्हणा ना !!
नदी दुतर्फा सोसाटयाने (पाण्याचा भयंकर वेग )वाहताना उतार कुठे मिळेल म्हणजे नदीच्या त्या भयंकर पात्रात कुठे उडी माराली की दुसऱ्या तिराला कुठे बाहेर येता येईल याचा अंदाज अगदी अमावस्येच्या काळोख्या रात्रिसुदधा छातीठोकपणे (expert ) सांगणारे गडी !!

महादेव शेठ कासारांविषयी काय सांगावं !!
लोक म्हणत भरल्या नदीत डोळ्यावर पट्टी बांधून गड्याला पाण्यात ढकला !!! वर आल्याशिवाय राहायचा नाही !! अहो ,  पाण्याखालचा प्रत्येक दगड कुठे आहे कातळ (खडक , याच्यावर आपटला तर संपलच) कुठे आहे ते घरात बसून  सांगणारा हा माणुस!!"

त्या दिवशी रात्रीपासूनच पाऊस अगदी मी म्हणत होता !! नादीने
उग्र रूप घरं केलं होतं !! 
भाऊ आणि ह्या दोघीजणी सकाळी लवकर उठून पाचलला जण्यासाठी निघाल्या . नदीपर्यंत पोचल्या मात्र ....
जवळच्याच घरातील रघुकाका(भाऊंचे मित्र ) आले,  आणि नदीचे ते पाणी आणि रूप बघून " शिरु आज अपील नाही . पाण्यात जाऊ नका !!!"
बापूराव पत्की भाऊंचे मित्र !! एकदम भित्रा माणूस " शिरुकाका काय वेड बीड लागलं की काय तुला . ह्या पोरींना घेऊन जतोयस कुठे ?? घरी चल !! " असं म्हणाले

बापुकाकाना भाऊ म्हणाले "जरा पुढे हो आणि महादेवाला (महादेव शेठ कासार ) मी बोलावलंय म्हणून सांग इथं  !'
तोपर्यंत महादेवशेठना ही बातमी समजली होतीच आणि ते ही धावत धावत तिथे आलेच .!!

नदीच्या काठावरून पुढे मागे जाऊन त्यांनी पाण्याचा अंदाज घेतला आणि ...
" शिरुकाका कसं सांगू... पण आज नदीला उतार (नदी cross करणं)  नाय !! "उद्या सकाळी मी आणि मधु (हे दोघे सख्खे भाऊ ) कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला पलीकडे पोहोचवतो!! पण आज नको !! " म्हणाले

कधी नाही ते भाऊंनी ऐकलं आणि ही तिन्ही माणसं घरी परत आली .

अस आत्तापर्यंत कधीच झालेलं नव्हतं त्यामुळे मामीलाही जरा आश्चर्य च वाटलं!!

रात्री पाऊस जरा थांबला की पुन्हा जोरात पडायचा त्यामुळे परिस्थिती फारशी सुधारली नव्हतीच !!
इकडे ह्या दोघींचे चेहरे बघण्यासारखे झाले होते कारण रजा केव्हांच संपली होती आणि आता कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाण भाग होत !

दुसऱ्यादिवशी पुन्हा सकाळी भाऊ आणि ह्या दोघी निघाल्या !!आतापर्यंत ही बातमी गावभर झाली होती . त्यामुळे आता हे लोक नदी काशी पार करतात ते बघायला नदी काठी 40 , 50 जण जमले  होते !!
महादेव आणि मधूशेठ कासार तर ह्यांच्या अगोदरच नदीकाठी पोहोचले होते . नदी तर कालच्यापेक्षाही जोरात वहात होती आणि पाणी कमी होण्याचं कोणतंही  लक्षण नव्हतं !!

महादेव शेठ : मधू , मी शिरूकाकाना शब्द दिलाय त्यांच्या मुलींना मी आज नदी पलीकडे  घालणारच !! भले माझ्या जीवच काय होईल ते होईल पण ही तिन्ही माणस आज पलीकडे गेली पाहिजेत !! '

मधूशेठ : दादा !!  हे काय तू सांगायला हवं !! तुझा शब्द तोच माझा शब्द !!

बापूकाका , रघूकाका सर्वांनी पुन्हा एकदा भाऊंना सांगितलं  "अरे शिरू तुला काय समजतं काय , ह्या पोरींकडे बघ , पाण्यात जर धरलेला हात सुटला तर तुमची हाडं सुद्धा नाही मिळायची !!"

भाऊ : आज एकतर  ह्यांना घेउन पलीकडे तरी जाईन नाहीतर...

महादेव शेठ : काय बोलता शिरुकाका !!
मी असताना   ... "नाहीतर काय ... काय बिशाद लागलीय या पाण्याची ... मधु ह्या (शोभाताई ) मुलीचा हात धर आणि चल.. त्या शेरणीच्या (एक नदिच्या पात्रात उगवणारी वनस्पती ) बेटाच्या वरच्या बाजून पाण्यात उडी घे !! पण लक्षात ठेव माझा शब्द आहे !! पोरीला पलीकडे नेल्याशिवाय हात नाही सोडायचा !! 
चल ...मी पण आहेच ह्या दुसऱ्या मुलीला घेऊन तुझ्या पाठोपाठ !! "

भाऊ म्हणाले मी पण येणार ... मीही हिचा (ताईचा) हात धरतो खालच्या बाजूने !!

रघुकाका बापुकाकाना म्हणाले आता हा कोणाचंही ऐकणार नाही  आणि आपल्या डोळ्यासमोर काही व्हायला नको !! मी घरी जातो !!

इकडे शोभाताईला धरून मधूशेठनि पाण्यात उडी घेतली मात्र !! आणि... आणि ..
दोन सेकंद ही दोन्ही माणसं जी पाण्याखाली गेली ती दिसेनाशीच झाली आणि  ... आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला !!!

तेवढ्यातच म्हदेवशेठ ,ताई आणि भाऊ हे पण पाण्यात शिरले होते !!

आता हे सगळेच पाण्याबरोबर वहात  जाणार अस वाटून काठावरच्या लोकांनी आरडा ओरडा करायला सुरुवात केली !!

याना वाचवण्याचा कोणतंही साधन नव्हतं !! उघड्या डोळ्यांनी बघण्यापलीकडे काहीही करता येण शक्य नव्हतं . लोक बोलत होते ...

"तरी आम्ही सांगत होतो पाण्यात जाऊ नका .. नदीच मारा घ्यायच वर्ष आहे !
(म्हणजे या वर्षी नदी माणसांचा बळी घेते)
एवढ्यात पाण्याबरोबर थोडं  वहात जाऊन मधूशेठ आणि शोभाताई बाहेर दिसले ...दोन तीन वेळा अस झालं आणि ह्या जोडीने अर्धी नदी पार केली !!

पुन्हा एकदा दोनदा बुडक्या मारल्या व हे दोघे कसे बसे दुसऱ्या बाजूच्या काठाला लागले !!

महादेव शेठ धोरणि  माणूस त्यांनी ताईचा एक हात स्वतःच्या खांद्यावरन धरला आणि लहान मुलाला जस पाठूनगळीला घेतात तस घेतलं , दुसऱ्या हाताने भाऊंना पकडलं आणि काहीही झाल तरी घाबरू नका !! जिवात जीव असे पर्यंत दोघानाही सोडणार नाही भले  माझं काय व्हायचं ते होऊ दे !! अस म्हणून ते ही पाण्यात शिरले !

त्यांची पण अवस्था आणखी बिकट झाली .
ते पाण्यात शिरले आणि पावसाला जोरात सुरवात झाली .
लोक म्हणू लागले वर (नदीचा उगम जिथे होतो ती जागा )  पाऊस कोसळतोय !! नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढायला लागली !!  आणि ..आणि फक्त ताईच डोकं तेवढं दिसत होतं बाकी ह्या दोघांच काहीही दिसत नव्हतं !! पाऊस तर मी म्हणत होता !!

आता सर्व परमेश्वराच्या हाती होत !

त्या परिस्थितीतही ही तीनही माणसं पलीकडे येतील ह्याची खात्री असणारा एकमेव माणूस म्हणजे मधूशेठ जे पलीकडे शोभाताईला घेऊन पोचले होतें .
ते शोभाताईला सारखं सांगत होते ! "तू भिऊ नकोस !!
जर काय तशीच वेळ आली तर मी पुन्हा पाण्यात उडी घेइन!!
पण दादा आहे तो !! पलीकडे येईलच !!
तेच खरं होतं!! जेव्हा ही माणसं आम्हाला नदीच्या पात्रात दिसली तेव्हा त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पार केला होतं !!

आता पुढे पाण्याचा वेग तसा कमी होता . महादेवशेठ नि ते उरलेलं अंतर सहज पार केल आणि आपला दिलेला शब्द खरा करून दाखवला !!

पलीकडे गेल्यावर हे दोघे भाऊ पुन्हा थोड्या नदीच्या पाण्यात गेले,  हाताच्या ओंजळीने थोडं नदीचं पाणी प्यायले आणि त्यानी नदीला नमस्कार केला !!

तुमच्यामध्ये हिम्मत असेल, स्वतःवर विश्वास असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवाला जीव देणारी माणसं तुमच्या बरोबर असतील आणि  आलेल्या वेळीं त्यांची तुम्ही योग्य निवड करू शकलात तर त्या संकटातूनही निभावून जाता येऊ शकत याच हे ज्वलंत उदाहरण !!

आज ह्या जगात माझे वडील --  भाऊ, माझी बहिण विजुताई , मधूशेठ कासार हे भाऊंचे मित्र नाहीत !!!. ह्या जगाचा निरोप त्यांनी केव्हाच घेतला तर महादेवशेठ यांनी वयाची 95 वर्ष पार केली आहेत !!!

पण आजही नदीला जेव्हा पूर येऊन पुलावरून पाणी वहायला लागतं व वाहतूक ठप्प होते तेव्हा लोक म्हणतात ..
"आज पुलावरून पाणी जातंय म्हणून आपण थांबलोय पण भरल्या नदीत उडी घेऊन दोन पोरींना पलीकडे घालणारी तीन माणस आम्ही बघितलीत , त्यांची नाव  " शिरुकाका , मधूशेठ आणि महादेवशेठ, अहो !! त्यांच्या छातीत काळीज नव्हतंच म्हणून पोटच्या पोरींसह भरल्या नदीत उडी घेऊन पलीकडे गेले !!
उलट्या काळजाची माणस ती !!!"

आज जेंव्हा पुलावरून  रोरावत जाणार लाल भडक पाणी मी पहातो तेव्हा या गोष्टीची आठवण येतेच !!
अस वाटतं केवढं धाडस (daring) !! या तीन माणसांनी व दोन मुलींनी केलं . जर  तर  चा विचार त्यांनी केलाच नाही !! वडील आणि त्यांची विश्वासाची माणसं बरोबर आहेत ना !!!
बस ... आपण पलीकडे जाणारच ...!!!

सलाम त्या वडिलांना , त्यांच्या मुलींना आणि जीवाला जीव देणाऱ्या त्याच्या मित्राना !!
🙏🙏🙏

अनंत प्रभुदेसाई

रेड्या - पाड्याची झुंज

*रेड्या - पाड्याची झुंज*

ही गोष्ट आहे रागाची, त्वेषाची, ताकदीची, एकजुटीची आणि दहशत बसवण्याची !!!

कोकणात जमिनी वरून होणाऱ्या भानगडी , वाद ,विवाद नवीन नाहीत. पण तरी सुद्धा एखादी जमीन ही अमुक एक घराण्याची आहे असं समजल्यावर शक्यतो इतर समंजस लोक त्यांच्या भानगडीत  पडत नसत !!

अशीच आमची एक जमीन घरापासून थोडी लांब आंबेवाडीच्याही (एक नाव )पुढे होती. एक वर्षी येसु जाधवाने त्या जमिनीवर ताबा घेतला व शेती केली. ही जमीन घरापासून खूपच लांब असल्यामुळे भाऊंना ते कोणीतरी सांगितल्यावरच समजलं.

जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता तरीसुद्धा भाऊंनी आमच्याकडे असणारे 2-3 गडी, त्यातील मांडवकर ह्या गड्याची निवड केली आणि त्याला सांगितलं :
"मांडवकर !! उद्या सकाळी पहिल्या कोंबड्यास (कोंबडा सकाळी 4 वाजता आरवतो तेव्हा ) उठून येसू जाधवला अंथरुणावर असतानाच गाठायचं आणि मी बोलावलंय म्हणून सांगायचं !"(माणूस नक्की भेटला पाहिजे म्हणून ही वेळ )

येसू जाधव ही काय सामान्य व्यक्ती होती काय!!
सामान्य माणूस कोठारवाल्यांच्या भांनगडीतच पडत नसे नव्हे कोठारवाले त्यात आहेत असं समजल्यावर लोक त्या गोष्टीच्या दिशेला सुद्धा जात नसत !!

मांडवकराने आपलं काम चोख बजावलं.
येसू जाधव हो देव देवस्की करणारा भगत होता. त्याला लोक खूप घाबरून असायचे. भगत म्हणजे देवाला नवस , गाऱ्हाणी घालायची , देव आपल्या हातात आहे असं सांगून लोकांचं आपण काहीही बरं वाईट करू शकतो अस सांगणं व लोकांचा विश्वास संपादन करणं आशा प्रकारचा माणूस. गावी या लोकांना खूप मान असतो व इतर लोक त्यांना खूप घाबरतात इतके की त्यांच्या विरुद्ध सोडाच पण त्यांच्या इतर बाबतीतही ते म्हणतील ती पूर्व दिशा ठरवतात . कारण त्यांची दहशत !!!

तर या पठयाने मांडवकराबरोबरच उलट निरोप पाठवला ...

" शिरुकाकास जाऊन सांग , जमीन माझी आहे, मी त्यात भात पिकवून खातोय ,  मला निरोप नको धाडू , तुझ्या मनगटात ताकद असेल तर जमीन नांगरून दाखव, येसू भगत म्हणतात मला !!  जा सांग त्याला ..…..."

काहीही असल तरी तळवडे गावात अस एकेरी नावाने आणि अशा प्रकारची भाषा भाऊंविषयी बोलण जरा जास्तच होत !!

भाऊंना एकेरी नावाने हाक मारणारे फक्त 2 - 3 च लोक होते एक बाबी सुतार, अत्यंत कसबी एक्स्पर्ट याच्याविषयी पुन्हा कधीतरी सांगेन आणि दुसरा गोविंद संभू , हा गावचा गुरव .... तो दारू प्यायला की भाऊंना शिरुकाका अस एकेरीने संबोधायचा व दारू उतरली की त्यांचे पाय पकडायचा ...

असो , तर असा उलट निरोप नव्हे धमकी देऊन ह्या माणसाने आग लावलीच होती !!!

गावातील लोकांनी येसूला समजावून सांगितलं  "कोठारवल्याना तू ओळखतोस ना !! ते अन्यायाने वागत नाहीत . गावासाठी त्यानि काय काय केलय , न्याय निवाडे, शिमग्याची काम, पालखीच्या भानगडी ह्या शिरुकाकांशिवाय दुसरा कोण सोडवतो "

काही असल तरी येसू हा "भगत" असल्यामुळे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत  नव्हता...

मांडवकर दुपारच्या सुमारास परत आला पण तो भाऊंच्या समोर जायला तयार होईना. काहीही बोलेचना . कारण " भगत " माणसाच्या विरुद्ध कस बोलायचं.

भाऊंनी त्याला दमात घेऊनच विचारलं आणि काय म्हणाला येसू ते स्पष्ट सांग म्हटल्यावर भीत भीतच त्यानं सगळं सांगितलं.
भाऊ काहीच बोलले नाहीत .

जून महिना सुरु होता. शेतीच्या कामांचा ऐन हंगाम ! 
अख्या तळवडे गावात पाच जोत बांधून शेती करणार आमचं एकमेव घर !
पहिलं जोत गाडीच्या बैलांच! त्या बैलांचं काय रुबाब ! पांढरी शुभ्र घाटी बैलांची जोडी, दोन्ही बैलांची एक हात उंच शिंग , आणि अस्पट मारकुटे बैल , दरारा इतका की ज्या वाटेने हे बैल जाणार असत तिकडे कोणी फिरकत सुद्धा नसे.

हे जोत धरणारे बाळूकाका म्हणजे सुद्धा दोन चांगल्या गाड्याची ताकद असणारा माणूस.

बाळूकाकांची ख्याती म्हणजे मस्तवाल बैलांशी झुंज घेणारा व बैलालाच आरी (ताबा मिळवणे) आणणारा हा माणूस .

तर पाहिलं जोत ते धरणार, नंतरची तीन गडी व शेवटच पाचवं तात्या व भाऊ मिळून धरत .

एक दिवस भाऊंनी सांगितलं आज जोतं आपली आंबेवाडीची जी जमीन आहे ती नांगरायला जाऊ देत.

आमची जोतं  येतायत ही बातमी येसू जाधवला समजली मात्र आणि तो त्याचा भाऊ इतर असे जमून तिथे आले . अख्या आंबेवाडीला त्याने वर्दी दिली "आज कोठारवले माझी जमीन नांगरायला येतायत त्यांना आता दावतोच माझी करणी . देव माझ्या हातात हाय!! नाय ह्याना पळवुन लावलं तर नावाचा येसू भगत नाय मी !!"

लोक म्हणायला लागले ....

" रेड्या -पाडयाच झुंज लागलंय कोण हटतो बघूया !!"

काही लोक होते त्यांनासुद्धा असा तमाशा बघायचाच होता!! बघूया जर बामनाची ताकद कुठवर हाय ती ! हा त्यांचा मनसुबा होता.

इकडे बाळूकाकांनी जस पहील जोत हकवायला सुरवात केली तशी येसूने कुऱ्हाड हातात घेतली आणि ...
"बाळूकाका ! पुढे जोत आणच , बघ कुऱ्हाडीने मुंडक उडवीन , येसू भगत हाय मी ,  आज दवतोच तुला माझी ताकद  ! "

बाळूकाका तस साध्य माणसाला भीक घालणारे नव्हतेच पण तरीसुद्धा ते जरा थांबलेच व त्यांनी एका गड्याला घरी धावत जाऊन भाऊंना हा प्रकार सांग व त्याला इथे यायला सांग अस सांगितलं

जोतं पुढे गेली की मागून जोत्यांची न्याहरी (नाश्ता ) घेऊन जाणं हे भाऊंच काम असायचं !
तर तेवढ्यातच हा गाडी घामाघूम होऊन धावत धावत येताना भाऊंनी बघितला व त्याने सर्व वृत्तांत भाऊ वाडा झाडत होते तिथेच सांगितलान ! व तुम्ही तिथे लवकर चला अस म्हणू लागला..

" तू पुढे हो मी तुमची न्याहरी घेऊन येतो . मग बघू कसकाय ते तो पर्यंत काही करू नका "अस भाऊंनी  सांगून त्याला पाठवून दिलं.
रोजच्या न्याहरिचया वेळेपेक्षा जरा लवकरच भाऊ तिथे पोचले. एका बाजूला रागाने चवताळलेला येसू खांद्यावर कुऱ्हाड ( मोठी मोठी झाडं तोडण्यासाठी वापरतात ती ) घेऊन कोठरवाल्यांचा उद्धार करत होता. अर्वाच्य शिव्या देत होता. त्याचा भाऊही मदतीला होताच. आणि हे सगळं बघायला 100- 150 लोक  जमले होतें पण कोणीही मधे पडेना करण येसू भगत ना ...

"शिरुकाका  जा आणि अख्खा गाव जमऊन घेऊन ये हवा तर पण आज जो जगेल त्याची ही जमीन "

भाऊंनी तिकडे लक्ष दिल नाही आणि सगळ्यांना न्याहरी करून जरा ताजे तवाने व्हायला सांगितलं !!

आता न्याहरी वगेरे झाली होती, भाऊ म्हणाले !
"बाळू ... तू  मागचं जोत आज धर .... पहिलं गाडीच्या बैलांच मी धरतो पण लक्षात ठेव काही झालं तरी आज ही जमीन  नांगरल्याशिवय घरी तोंड नाही दाखवायचं ! ....हा मुंडक उडवतोय ना ! आता बघूया कोण कुणाचं मुंडक उडवतो ते ! आणि किती मुंडकी उडतात ती पण...."

जून महिन्यातला पाऊस तर काय मी म्हणत होता !  मुसळासारखी एक एक धार खाली येत होती. भाऊंनी  डोक्यावर धरलेली  छत्री दिली टाकून.... आणि गाडीच्या बैलांचा कासरा डाव्या हातात धरला आणि भोवरी लावायला रूमणी (नांगर) वर हात ठेवला मात्र ......

येसू जाधव कुर्हाड घेऊन पुढे सरसावला ....

"शिरुकाका जोत पुढे आणून तर बघ मान तोडून हातात देऊन "
.........

घरातून निघतानाच भाऊंनी  रान चिवरीची एक काठी  (मुंबईत कपडे वाळत घालण्यासाठी वापरतो तशीच पण एकदम भरीव आणि  भक्कम ) बरोबर घेतली होतीच...

त्या काठीनेच दोन्ही बैलांच्या एक एक तडाखा दिला मात्र , घाटी मारकुटी जनावरच ती ... अंगाला काठीचा स्पर्श सुद्धा त्यांना चालत नसे आणि काठीचा फटका बसल्याबरोबर जी धावून  येसू जाधवच्या अंगावर गेली ती निशाण (बैलाच नाव ) बैलाने एकदाच खाली मान घालून येसू जाधवला त्याच्या कुऱ्हाडीसह शिंगावर उचलला आणि जो भिरकावून दिला तो चार  फरलांगवर जाऊन पडला त्याला वर उठता सुद्धा येईना ! कुठची कुऱ्हाड आणि कुठंच काय ...

आता जोतं थाबणार नव्हती जमीन नांगरून पूर्ण होईपर्यंत !!

मागचं जोत बाळूकाका हकवीत होते त्यांनी येसूच्या भावला सांगितलं ....

"भ....व्या , ये पुढे ये... माझा बैलच तुला वर पाठवायला पुरेसा आहे  पण ह्या जमिनीत जर पाऊल ठेवलस तर ती कुऱ्हाड आणि तूला ह्या इथेच पुरून ठेवीन कायमचा !!!"

हे ऐकून येसूच्या भावाने तेथून जो पळ काढला तो सरळ आपल्या घरी जाऊन थांबला !!

नंतर सम्पूर्ण जमीन नांगरुन झाली तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते !

हा सगळा तमाशा बघायला अख्खी आंबेवाडी हजर होती !!(50--100लोक)

आता लोक म्हणायला लागले कोठारवालेच ते ..
त्यांच्या नादाला कोण लागेल !!!

मंडळी लक्षात घ्या कोकणातल्या ज्या जमिनी आज आपण उपभोगत आहोत त्या मिळवणं आणि टिकवणं सोपं काम कधीच नव्हतं त्यासाठी आपल्या वडीलधाऱ्यानी आपल्या रक्ताचं पाणी केलंय !!

ही गोष्ट आहे एकजुटीची , दरारा दाखवण्याची , जरब बसवण्याची आणि सत्याची ...... त्या शौऱ्याला सलाम !!!

अनंत प्रभुदेसाई.