*रेड्या - पाड्याची झुंज*
ही गोष्ट आहे रागाची, त्वेषाची, ताकदीची, एकजुटीची आणि दहशत बसवण्याची !!!
कोकणात जमिनी वरून होणाऱ्या भानगडी , वाद ,विवाद नवीन नाहीत. पण तरी सुद्धा एखादी जमीन ही अमुक एक घराण्याची आहे असं समजल्यावर शक्यतो इतर समंजस लोक त्यांच्या भानगडीत पडत नसत !!
अशीच आमची एक जमीन घरापासून थोडी लांब आंबेवाडीच्याही (एक नाव )पुढे होती. एक वर्षी येसु जाधवाने त्या जमिनीवर ताबा घेतला व शेती केली. ही जमीन घरापासून खूपच लांब असल्यामुळे भाऊंना ते कोणीतरी सांगितल्यावरच समजलं.
जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता तरीसुद्धा भाऊंनी आमच्याकडे असणारे 2-3 गडी, त्यातील मांडवकर ह्या गड्याची निवड केली आणि त्याला सांगितलं :
"मांडवकर !! उद्या सकाळी पहिल्या कोंबड्यास (कोंबडा सकाळी 4 वाजता आरवतो तेव्हा ) उठून येसू जाधवला अंथरुणावर असतानाच गाठायचं आणि मी बोलावलंय म्हणून सांगायचं !"(माणूस नक्की भेटला पाहिजे म्हणून ही वेळ )
येसू जाधव ही काय सामान्य व्यक्ती होती काय!!
सामान्य माणूस कोठारवाल्यांच्या भांनगडीतच पडत नसे नव्हे कोठारवाले त्यात आहेत असं समजल्यावर लोक त्या गोष्टीच्या दिशेला सुद्धा जात नसत !!
मांडवकराने आपलं काम चोख बजावलं.
येसू जाधव हो देव देवस्की करणारा भगत होता. त्याला लोक खूप घाबरून असायचे. भगत म्हणजे देवाला नवस , गाऱ्हाणी घालायची , देव आपल्या हातात आहे असं सांगून लोकांचं आपण काहीही बरं वाईट करू शकतो अस सांगणं व लोकांचा विश्वास संपादन करणं आशा प्रकारचा माणूस. गावी या लोकांना खूप मान असतो व इतर लोक त्यांना खूप घाबरतात इतके की त्यांच्या विरुद्ध सोडाच पण त्यांच्या इतर बाबतीतही ते म्हणतील ती पूर्व दिशा ठरवतात . कारण त्यांची दहशत !!!
तर या पठयाने मांडवकराबरोबरच उलट निरोप पाठवला ...
" शिरुकाकास जाऊन सांग , जमीन माझी आहे, मी त्यात भात पिकवून खातोय , मला निरोप नको धाडू , तुझ्या मनगटात ताकद असेल तर जमीन नांगरून दाखव, येसू भगत म्हणतात मला !! जा सांग त्याला ..…..."
काहीही असल तरी तळवडे गावात अस एकेरी नावाने आणि अशा प्रकारची भाषा भाऊंविषयी बोलण जरा जास्तच होत !!
भाऊंना एकेरी नावाने हाक मारणारे फक्त 2 - 3 च लोक होते एक बाबी सुतार, अत्यंत कसबी एक्स्पर्ट याच्याविषयी पुन्हा कधीतरी सांगेन आणि दुसरा गोविंद संभू , हा गावचा गुरव .... तो दारू प्यायला की भाऊंना शिरुकाका अस एकेरीने संबोधायचा व दारू उतरली की त्यांचे पाय पकडायचा ...
असो , तर असा उलट निरोप नव्हे धमकी देऊन ह्या माणसाने आग लावलीच होती !!!
गावातील लोकांनी येसूला समजावून सांगितलं "कोठारवल्याना तू ओळखतोस ना !! ते अन्यायाने वागत नाहीत . गावासाठी त्यानि काय काय केलय , न्याय निवाडे, शिमग्याची काम, पालखीच्या भानगडी ह्या शिरुकाकांशिवाय दुसरा कोण सोडवतो "
काही असल तरी येसू हा "भगत" असल्यामुळे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता...
मांडवकर दुपारच्या सुमारास परत आला पण तो भाऊंच्या समोर जायला तयार होईना. काहीही बोलेचना . कारण " भगत " माणसाच्या विरुद्ध कस बोलायचं.
भाऊंनी त्याला दमात घेऊनच विचारलं आणि काय म्हणाला येसू ते स्पष्ट सांग म्हटल्यावर भीत भीतच त्यानं सगळं सांगितलं.
भाऊ काहीच बोलले नाहीत .
जून महिना सुरु होता. शेतीच्या कामांचा ऐन हंगाम !
अख्या तळवडे गावात पाच जोत बांधून शेती करणार आमचं एकमेव घर !
पहिलं जोत गाडीच्या बैलांच! त्या बैलांचं काय रुबाब ! पांढरी शुभ्र घाटी बैलांची जोडी, दोन्ही बैलांची एक हात उंच शिंग , आणि अस्पट मारकुटे बैल , दरारा इतका की ज्या वाटेने हे बैल जाणार असत तिकडे कोणी फिरकत सुद्धा नसे.
हे जोत धरणारे बाळूकाका म्हणजे सुद्धा दोन चांगल्या गाड्याची ताकद असणारा माणूस.
बाळूकाकांची ख्याती म्हणजे मस्तवाल बैलांशी झुंज घेणारा व बैलालाच आरी (ताबा मिळवणे) आणणारा हा माणूस .
तर पाहिलं जोत ते धरणार, नंतरची तीन गडी व शेवटच पाचवं तात्या व भाऊ मिळून धरत .
एक दिवस भाऊंनी सांगितलं आज जोतं आपली आंबेवाडीची जी जमीन आहे ती नांगरायला जाऊ देत.
आमची जोतं येतायत ही बातमी येसू जाधवला समजली मात्र आणि तो त्याचा भाऊ इतर असे जमून तिथे आले . अख्या आंबेवाडीला त्याने वर्दी दिली "आज कोठारवले माझी जमीन नांगरायला येतायत त्यांना आता दावतोच माझी करणी . देव माझ्या हातात हाय!! नाय ह्याना पळवुन लावलं तर नावाचा येसू भगत नाय मी !!"
लोक म्हणायला लागले ....
" रेड्या -पाडयाच झुंज लागलंय कोण हटतो बघूया !!"
काही लोक होते त्यांनासुद्धा असा तमाशा बघायचाच होता!! बघूया जर बामनाची ताकद कुठवर हाय ती ! हा त्यांचा मनसुबा होता.
इकडे बाळूकाकांनी जस पहील जोत हकवायला सुरवात केली तशी येसूने कुऱ्हाड हातात घेतली आणि ...
"बाळूकाका ! पुढे जोत आणच , बघ कुऱ्हाडीने मुंडक उडवीन , येसू भगत हाय मी , आज दवतोच तुला माझी ताकद ! "
बाळूकाका तस साध्य माणसाला भीक घालणारे नव्हतेच पण तरीसुद्धा ते जरा थांबलेच व त्यांनी एका गड्याला घरी धावत जाऊन भाऊंना हा प्रकार सांग व त्याला इथे यायला सांग अस सांगितलं
जोतं पुढे गेली की मागून जोत्यांची न्याहरी (नाश्ता ) घेऊन जाणं हे भाऊंच काम असायचं !
तर तेवढ्यातच हा गाडी घामाघूम होऊन धावत धावत येताना भाऊंनी बघितला व त्याने सर्व वृत्तांत भाऊ वाडा झाडत होते तिथेच सांगितलान ! व तुम्ही तिथे लवकर चला अस म्हणू लागला..
" तू पुढे हो मी तुमची न्याहरी घेऊन येतो . मग बघू कसकाय ते तो पर्यंत काही करू नका "अस भाऊंनी सांगून त्याला पाठवून दिलं.
रोजच्या न्याहरिचया वेळेपेक्षा जरा लवकरच भाऊ तिथे पोचले. एका बाजूला रागाने चवताळलेला येसू खांद्यावर कुऱ्हाड ( मोठी मोठी झाडं तोडण्यासाठी वापरतात ती ) घेऊन कोठरवाल्यांचा उद्धार करत होता. अर्वाच्य शिव्या देत होता. त्याचा भाऊही मदतीला होताच. आणि हे सगळं बघायला 100- 150 लोक जमले होतें पण कोणीही मधे पडेना करण येसू भगत ना ...
"शिरुकाका जा आणि अख्खा गाव जमऊन घेऊन ये हवा तर पण आज जो जगेल त्याची ही जमीन "
भाऊंनी तिकडे लक्ष दिल नाही आणि सगळ्यांना न्याहरी करून जरा ताजे तवाने व्हायला सांगितलं !!
आता न्याहरी वगेरे झाली होती, भाऊ म्हणाले !
"बाळू ... तू मागचं जोत आज धर .... पहिलं गाडीच्या बैलांच मी धरतो पण लक्षात ठेव काही झालं तरी आज ही जमीन नांगरल्याशिवय घरी तोंड नाही दाखवायचं ! ....हा मुंडक उडवतोय ना ! आता बघूया कोण कुणाचं मुंडक उडवतो ते ! आणि किती मुंडकी उडतात ती पण...."
जून महिन्यातला पाऊस तर काय मी म्हणत होता ! मुसळासारखी एक एक धार खाली येत होती. भाऊंनी डोक्यावर धरलेली छत्री दिली टाकून.... आणि गाडीच्या बैलांचा कासरा डाव्या हातात धरला आणि भोवरी लावायला रूमणी (नांगर) वर हात ठेवला मात्र ......
येसू जाधव कुर्हाड घेऊन पुढे सरसावला ....
"शिरुकाका जोत पुढे आणून तर बघ मान तोडून हातात देऊन "
.........
घरातून निघतानाच भाऊंनी रान चिवरीची एक काठी (मुंबईत कपडे वाळत घालण्यासाठी वापरतो तशीच पण एकदम भरीव आणि भक्कम ) बरोबर घेतली होतीच...
त्या काठीनेच दोन्ही बैलांच्या एक एक तडाखा दिला मात्र , घाटी मारकुटी जनावरच ती ... अंगाला काठीचा स्पर्श सुद्धा त्यांना चालत नसे आणि काठीचा फटका बसल्याबरोबर जी धावून येसू जाधवच्या अंगावर गेली ती निशाण (बैलाच नाव ) बैलाने एकदाच खाली मान घालून येसू जाधवला त्याच्या कुऱ्हाडीसह शिंगावर उचलला आणि जो भिरकावून दिला तो चार फरलांगवर जाऊन पडला त्याला वर उठता सुद्धा येईना ! कुठची कुऱ्हाड आणि कुठंच काय ...
आता जोतं थाबणार नव्हती जमीन नांगरून पूर्ण होईपर्यंत !!
मागचं जोत बाळूकाका हकवीत होते त्यांनी येसूच्या भावला सांगितलं ....
"भ....व्या , ये पुढे ये... माझा बैलच तुला वर पाठवायला पुरेसा आहे पण ह्या जमिनीत जर पाऊल ठेवलस तर ती कुऱ्हाड आणि तूला ह्या इथेच पुरून ठेवीन कायमचा !!!"
हे ऐकून येसूच्या भावाने तेथून जो पळ काढला तो सरळ आपल्या घरी जाऊन थांबला !!
नंतर सम्पूर्ण जमीन नांगरुन झाली तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते !
हा सगळा तमाशा बघायला अख्खी आंबेवाडी हजर होती !!(50--100लोक)
आता लोक म्हणायला लागले कोठारवालेच ते ..
त्यांच्या नादाला कोण लागेल !!!
मंडळी लक्षात घ्या कोकणातल्या ज्या जमिनी आज आपण उपभोगत आहोत त्या मिळवणं आणि टिकवणं सोपं काम कधीच नव्हतं त्यासाठी आपल्या वडीलधाऱ्यानी आपल्या रक्ताचं पाणी केलंय !!
ही गोष्ट आहे एकजुटीची , दरारा दाखवण्याची , जरब बसवण्याची आणि सत्याची ...... त्या शौऱ्याला सलाम !!!
अनंत प्रभुदेसाई.
No comments:
Post a Comment