*बाबी मेस्त्री*
मंडळी तळवडे गाव , त्यविषयी काय आणि किती सांगावं. अतिशय समृद्ध, तसेच या गावात एकापेकशा एक असे कलाकार लोक होऊन गेले. त्यांच्या कला, स्वभाव त्यांचं राहाणीमान हा वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो .
तर असाच बाबी मेस्त्री म्हणजे बाबी सुतार हा त्यापैकी एक ...
हा माझ्या वडिलांना म्हणजे भाऊंना सिनियर असावा कारण फार थोडे लोक भाऊंना एकेरी नावाने हाक मारायचे त्यात हा बाबी "शिरुकाका, काय सकाली सकाली चाय प्याला माझ्याकडे आलास की काय "
अस विचारायचा...
" चल आलोच शालेत बस तवसर..." बाबीने सागितलं..( शाळा म्हणजे सुतार काम करण्याची घरापासूनची वेगळी झोपडी )
बाबी चा पेहराव सुद्धा तसा हटके असायचा . पांढर धोतर ( म्हणजे त्याचा ओरिजिनल रंग) , फुल बाह्यांचा गंजी , वरती कब्जा ( ह्याला वर्ती खाली दोन दोन व आतल्या दोन्ही बाजूना एक एक असे एकूण सहा खिसे असणार खाकी रंगाचं जाकीट) , त्यातला एका खिशात 4-5 विड्या आणि दुसऱ्यात खास चकचकीत लायटर हमखास असायचा , कारण बाबीच अग्निहोत्र कायम प्रज्वलीत असायचं , डोक्याला सफेद ( म्हणजे हा रंग आम्हालाच ओळखता यायचा )पण घामाने वेलबुट्टी तयार झालेली टोपी , गळ्यात जानव आणि पायात चामडयाच्या चपला , एकदम सडपातळ पण 6 फूट उंच अशी ही मूर्ती !!!
याचा व्यवसाय म्हणजे बंदुकी दुरुस्त करणे . तस लायसन त्याच्याकडे होतं. कधीही रात्री दिवसा बाबी बंदुकीची लोखंडी नळी घासताना किंवा बंदुकीचा घोडा एक डोळा बारीक करून तयार करताना दिसायचा . पण हो संध्याकाळी हा नेहमी पाचलला (शेजारचच गाव जरा सुधारलेलं , तिथे ST थांबायची ) न चुकता जाणार , लब्दे (एक व्यापारी) यांच्या दुकानात बसून 3 - ४ विड्या प्यायच्या व परत घरी यायचं , या नित्यक्रमात कधीही फरक पडत नसे.
मंडळी आता सांगायला हरकत नाही हा बाबी बंदुका तयार करण्यात माहीर होता , नव्हे त्याने तयार केलेल्या बंदुकीना घाटावर इतकी मागणी होती की बस , रोज 3-4 बंदुकी विकल्या जायच्या (without licence) .
एकदा पोलिसांनी धाड टाकली व बाबीला रंगे हात पकडलं व हातात बिड्या ठोकून अटक करून राजपुरला घेऊन जायची तयारी केली आणि " बाबी सुतारास बिड्या घालून पोलीसानी अटक केली " ही बातमी गावात , पाचलला सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली ...
आता बाबी हा तसा गावचा सुतार त्याला बिड्या ठोकून गावातून नेणार म्हणजे गावची अब्रू जाणार !!!
भाऊंना हे समजलं त्यांनी दुकानं बंद केलं व दुपारच जेवण न जेवताच मामीला "जरा जाऊन येतो " म्हणून सांगितलं (कुठे जाताय !! म्हणून विचारायची मामीची प्राज्ञा नव्हतीच, करण त्यांचा चेहराच तसा झाला होता )
देव कुठे पावला माहीत नाही , पण
"त्या बाबल्या सुतारास अटक झालीय , जरा बघतो जाऊन कोण इन्स्पेक्टर आहे तो ....."
भाऊंनी सांगितलं ....
बाबीच घर गावच्या लोकांनी तुडुंब भरलं होत व फणसळकर इन्स्पेक्टर बिड्या व दोरखंड घेऊन अटक करणार इतक्यात भाऊ आले व हे फणसळकर ... ब्राह्मण माणूस .... भाऊंना ओळखत होते ते एकदम उठून उभे राहिले आणि "शिरूभाऊ !!! तुम्ही कुठे चाललात" म्हणाले .
भाऊंना बघितल्यावर बाबीच्या डोळ्यात पाणी आलं व बाबीची बायको भाऊंच्या पायावर डोकं ठेऊन तुम्ही आता आम्हाला वाचवा अस म्हणून तीन हंबरडा फोडला ....
भाऊंनी प्रथम सगळ्या लोकांना "अरे .भ...व्यानो तुम्ही इथे काय तमाशा बघताय काय , घरदार नाही तुम्हांस, चला चालायला लागा बघू "
अस म्हणून सगळी गर्दी हटवली .
भाऊंनी फणसळकराना बाजूला घेतलं व घरी माघरणीने दोन जेवणाची ताट वाडलीयेत ती टाकून आलोय , तुम्ही जेवलात तरच मी जेवणार अस सांगितलं व त्यांना बरोबर घेऊनच ते निघाले....
पण जाताना फणसळकरानी दोन पोलिसांना बाबीवर लक्ष ठेवा अस बजावलं ...
जेवण झाल्यावर "शिरूभाऊ !!! तुम्ही उशीर केलात आता काहीही करता येणार नाही , अटक ही होणारच" अस निक्षून सांगितलं .....
भाऊंनी विचार केला
" फणसळकर अत्ता 4 च्या गाडीने तुम्ही राजपुरला जा, बाबी तूमच्याबरोबर येईल पण बिड्या नाही घालायच्या, तुम्ही म्हणाल तिथे , तुमच्या मागोमाग तो येईल , जबाबदारी माझी..."
फणसळकरानी मान्य केलं व अटक टळली...
दुसऱ्या दवशी सकाळी पहिल्या ST ने भाऊनि राजापूरच कोर्ट गाठलं , बाबीला झालेला दंड रुपये 500 , भरला ,
पण मंडळी रुपये 1000 स्वतः भरून बाबीला बंदुका दुरुस्त करण्याचं लायसन मिळवून दिलं व त्याला घेऊनच हे दोघेही तळवड्याला संध्याकाळच्या आत हजर झाले .....
ज्याला अटक होणार होती तो लायसन घेऊन मोठ्या दिमाखात गावात परतला होता .....
लोक हळू हळु बोलायला लागले होतें
" शिरुकाकांच्या गावचा सुतार हाय तो . . ...
उगाच नाय कोठारवाले धंदा टाकून सकाळी सकाळी राजापुरास धावले ..."
असा हा बाबी सुतार .....
मंडळी ह्या माणसाच्या अंगात अंगात इतक्या कला होत्या की काय काय सांगावं ...
आमच्या तळवड्याच्या दुकानाच्या इमारती समोर मोठी मांडवी बांधायच काम मुरातले (एक गाव, व त्या गावाच्या नावावरूनच प्रसिद्ध असणारे ) सुतार करीत होते. ही मांडवी किती मोठी होती , तर समोरा समोर 13 , 12सागवानी खांब, (लांबी) प्रत्येक दोन खांबामध्ये एका मोठ्या गड्याचे मध्ये उभे राहून दोन खांबांना हात पोचले नाही पाहिजेत इतकं अंतर , (मंडळी समजून घ्या!!! ही गावची मापं आणि भाषा आहे ती तशीच सांगण्यात मजा आहे )आणि रुंदी 3 गाड्यांच्या हाताला हात भीडणार (touch)नाही इतकी आणि वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही बाजूला भिंत नाही , चारही बाजूने ही मांडवी उघडी !!! (भव्यतेची जाणीव व्हावी )
आणि म्हणूनच मुरचे प्रसिद्ध सुतार ती बांधत होते !!
कोकणातल्या परंपरा काहीही झालं तरी तेथील लोक मोडत नाहीत.
सकाळी सकाळी भाऊ याच कारणासाठी बाबी सुताराकडे आले होते . कोणतंही घराचं बाधकाम असो गावच्या सुताराचा मान झालाच पाहिजे !! तिथे केल्या जाणाऱ्या पूजेची धोतर जोडी, मानाचा नारळ आणि दकशीणेच पाकीट यावर हक्क गावच्या सुतारांचाच असतो आणि तो त्यांना द्यायचाच असतो इतकंच नाही तर यजमानाने हे काम करण्यास तुझी सहमती आहेना अस विचारून काम पूर्ण करून घ्यायची जवाबदारी तू घे व तुझी परवानगी असेल तरच घराच्या सरास (लाकडी खांब) कुर्हाड लाव व कामास सुरवात कर !! "
असं यजमानाने आदरपूर्वक सांगायचं असत !!!
अशाप्रकरे सर्व सोपसकर झाले व मुरातले 15 सुतार दोन महिने सतत काम करून मांडावी उभी राहिली . एकसमोर एक असे 24 खांब , एकदम सरळ रेषेत , मधलं भव्य अंतर . गावातील आजूबाजूचे लोक इमारत बघायला यायचे. (मंडळी ही गोष्ट साधारण पणे 100 वर्षांपूरवीची आहे) काही जाणते लोक इमारतीची लांबि किती, रुंदी किती, कौल किती लागतील असे वेगवेगळे तर्क करून जायचे !!!
थोड्याच दिवसात इमारतिचा आयताकृती ढाचा तयार झाला , आढ (छता चा मध्य भाग ) ठेवलं गेलं ,आंब्याचं टाळा, कोव्हाळा बांधला आणि मुरच्या सुतारानी आनंदाने बंदुकीने चार बार हवेत काढले !! आणि कौल घालण्यासाठी वासे (छतापासूनचे supportr) लावले गेले. संध्याकाळ झाली आणि दुसऱ्या दिवशी कौंल घालण्यासाठी काम थांबलं !!
........
सकाळी सुतार कामावर आले मात्र आणि आपआपसात कुजूबायला लागले . एकमेकांशी बोलून इमारतीच्या चारही बाजूने फेऱ्या मारू लागले. पण कामाला सुरुवात करिनात , काय झालं, काय झालं...
कोणीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हता ...
साधारण माणसाच्या काही लकशात येईना !!
इमारत पूर्ण होत आली आणि आता काय झालं !!! सगळेच जण बुचकळ्यात पडले !!
अस काहीतरी घडलं होतं !! पण कोणीही सांगत नव्हतं !!
शेवटी त्या 15 सुतारांपैकी एकजण भाऊंना म्हणाला ...
"काका येक गोष्ट झाली बघा !! काय ध्येनात येत नाय , आमची चूक पदरात घ्या, पण आमची अब्रू राखा , पाया पडतो तुमच्या !!"
" मेस्त्री , काय झालं ते तर सांगा !! " भाऊ
" काका , कस बोलू !! वाचा नाय माझी !!" मेस्त्री
" मेस्त्री, काय झालं सांगा" भाऊ
..........
आता सर्व काम झाल्यावर हा प्रॉब्लेम कसा सुधारायचा ....
भाऊ सकळी लवकर उठले आणि थेट त्यांनी बाबी सुतार च घर गाठलं !! आणि बाबीला बरोबर घेऊनच ते घरी आले !!
" वयनि , काय चांगली दुधाची चाय कर आणि मला दे "
परस्थिती अशी की दुधाचा काय सोन्याचा चहा सुद्धा दिला असता ...मामीने.
बाबीने चहा घेतला , आणि
"शिरुकाका खय गेला , दुकान उघड , मला दोन विड्या दे !! " बाबी
एक विडी बाबीने तिथेच शिलगावली व दूसरी त्या विडीनेच पेटवून चला आता बघूया मुरकऱ्यानि कस काय काम केलंय ते अस म्हणून स्वारी मांडवी पर्यंत आली .....
" अरे वो शेंताराम , काटकोन्या घे इकडं , !!!
बाबीने एका बाजूच्या 3-४ खांबांना कटकोण्या लावला , काहितरी अंदाज बांधला आणि खुशीत बिडी शिलगावली....
आता दुसऱ्या बाजूवर नजर टाकली , काटकोन्या गंजीत अडकवला , जाकीट काढलं, धोतराचा घट्ट कासोटा उभ्या उभ्याच मारला आणि टुणकन उडी मारून एकदम छतावर चढला गडी...
वरून नजर नुसती सगळीकडे भिरभिरत होति , जे पाहिजे ते नजरेत पकडलं आणि स्वारी खाली उतरली !!!
आता बाबीच्या आजू बाजूला ते सगळे 15 सुतार, घरातील 3, 4 पुरुष , मूल बाळ अशी गर्दी जमली होती . सुतारांचे चेहरे बघण्यासारखे केविलवाणे झाले होते तर घरचे पुरुष मुलांवर डाफरत होते !!!
बाबी उठला ...आणि आता हा काय सांगतो .... इकडे सर्वजण अगदी कानात प्राण आणून बघत होतें...
"शिरुकाका इकडे ये , उद्या राजापुरास जा आणि 48 , एक इंच जाडीच्या आणि 6 फूट लांबीच्या लोखंडी पट्ट्याआणि 100 nut bolts घेऊन ये !! " बाबीने फर्मावल ...
मंडळी काय झालं होतं तर सम्पूर्ण इमारत 90% तयार झाली होति आणी वरती कौंल घालण्यापूर्वी ती दोन बाजूना झुकली होती....
मंडळी ह्या पट्ट्या आणल्यावर त्या पट्ट्याची दोन्ही टोकं , इमारत ज्या बाजूला झुकली होती त्याच्या विरुद्ध बाजूला पिळून , उभ्या केलेल्या त्याच खांबांवर nut बोल्ट च्या साह्याने एकदम घट्ट बसवल्या बाबीने . मोठ्या पान्यायाने nut बसवते वेळी झुकलेल्या बाजूने बरोबर काटकोन होतोयना याची खात्री शांताराममेस्त्रीला करायला सांगितली ...आणि बाबी मेस्त्री आपल्याच खुशीत इमारतीच्या आढ्या वरून खाली उतरला ....
" शेंताराम, आतां बघ बारी काम कस झोकात झालं ते !! आता धा (10) गडी वर चढा आणि मगलूर चढवा बघतोच मांडवी खयच्या दिशेस बघतेय ती... ...अरे साला पुढची 100 वर्स जर खांब हलला तर बाबी सुताराची अवलाद नाय सांगणार !! मगे तुमि बी हाय आणि जगलो वाचलो तर मी बी हाय !!"
मुरच्या सुतारानी भीत भीत बाबी मेस्त्रीला मोबदला विचारला .....
त्यावर बाबीने दिलेलं उत्तर .....
"अरे मेस्त्रीनो !!!! माझ्या हातात जेव्हा बेड्या पडायची वेळ आली होति तेव्हा शीरुकाकास मी बोलावया नव्हतो गेलो .......
हरामखोर.. सगळा गाव हसत होता मला पण एकटा शिरुकाका माझ्यासाठी धंदा बंद करून राजापूर पर्यंत धावला , खिशात दिडकी सुदधा नव्हती माझ्या त्या येळेस !!!
माझा मोबदला विचारताय ... तो सुद्दा काम झाल्यावर .... अरे वयनीच्या हातचा एक कप चा , तो सुदधा काम होन्या अगोदरच मी घेतलाय आता राहिली बिडी ती शिरुकाका देईलच ...."
मंडळी आजही ही मांडवी आणि तिचे खांब आणि त्याने बसवलेल्या त्या लोखंडी पट्ट्या बाबी सुताराचा शब्द खरा करण्यासाठी जश्याच्या तशा आहेत, बाकी इमारत ढासळली आहे पण खांब एकदम काटकोनात उभे आहेत ....याच मांडावीत काय काय सोहळे पार। पडले त्याविषयी पुन्हा कधीतरी .....
याला म्हणतात बाबी मेस्त्रीं!! तो तळवडे गाव त्याची ती कला व त्यावरचा विश्वास !!!
शतशः सलाम !!!
या गावच्या सत्य घटना, गोष्टि ऐकण्याच , अनुभवण्याचा काही अंशी भाग्य मला लाभलं म्हणून मीही भाग्यवंतच नाही का !!!
अनंत प्रभुदेसाई.