Saturday, 3 July 2021

सप्रे गुरुजी

*सप्रे गुरुजी*
पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे नंबर 1 .या शाळेला आपलयाच गावातील लाभलेले हे मुख्याध्यापक .
आमची ही शाळा त्याकाळी १ ते  7 वी पर्यंत होती . मी याच शाळेतून 1971 साली सातवी पास झालो .

मला लाभलेले सप्रे गुरुजी यांनी आम्हाला 5 वी आणि 6 वी मध्ये शिकवल्याच आठवतं...

मंडळी त्या काळी एकच गुरुजी सगळे विषय शिकवायचे .त्यामुळे कोणताही विषय शिकवताना वेळेच बंधन नसायचं !!
सप्रे गुरुजींचे आवडते विषय इतिहास , भूगोल आणि सर्वात आवडता विषय गणित होता.
इतिहास त्यातील शिवाजी महाराजानी गनिमी काव्याने जिंकलेल्या लढाया ते इतक्या खुलवून सांगायचं की खूप मजा यायची ऐकायला.
पेशवाई , त्यातील माधवराव पेशवे यांच्यावरचा धडा शिकवणं चक्क दोन दिवस चालायचं . त्यातच आमची शाळा सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा असायची.
एकदा शाळेत गेल्यावर आमचं म्हणजे नीदान माझं तरी लक्ष शाळा सुटते कधी इकडेच  असायचं त्यमुळे गुरुजींनी सकाळी शिकवलेली कोणतीही गोष्ट संध्याकाळी फारशी आठवायची नाही ....

कधी कधी तेह विचारायचे ..
"हा ... सांगा... आपण कुठपर्यंत आली होतो... "
आणि हे काम उषा , पुष्पा ह्या हुषार मुली लगेचच सांगायच्या व बाकीच्यांची सुटका व्हायची ...
शेवटी माधवराव पेशवे यांनी आठ दहा वर्ष वय असताना संपूर्ण राज्य कसं सांभाळलं आणि तुम्ही काय करत आहात याची तुलना करून धडा संपायचा ....

भूगोल हा विषयही ते आवडीने शिकवायचे पंजाब मध्ये असणारी शेती ,  बंगालमध्ये चालणारी मासेमारी व त्यावर होणारी उवजीविका,  आसाम मध्ये असणारे चहाचे मळे  असं खूप काही ते एकदम समरस होऊन शिकवायचे 

पण प्रश्न विचारल्या नंतर आम्ही आसाम मध्ये मासेमारी बंगालमध्ये चहा असं सगळं घोळ करून सांगायचो ....
....
"अरे घरी गेल्यावर कधीतरी ते पुस्तक उघडा... वाचा जरा ...
नाहीतर फुल घालून पूजा करा त्याची !!"
हा त्यांचा डायलॉग असायचा ...
सगळ्यात आवडता विषय गणित ...
खूप चांगलं शिकवायचे .
वर्गातल्या मुलांनी उभं रहायचं , ते गणित घालणार आणि तोंडी हिशोब करून उत्तर लिहायची ही  (माझ्यासाठी त्रासदायक ) पद्धत होती.

अर्थात 10 पैकी  4 -5 बरोबर यायचे , पण त्यातील एक दोन तरी एकमेकाला खुणा करून , बोट दाखवून वगैरे जे जे शक्य असेल ते सर्व करून लिहिलेलं असायचं त्यामुळे सांग... 
" तू हे कसं केलेस ?"
ह्या गहन प्रश्नाचं उत्तर सांगता यायचं नाहीच पण आपण लिहिलेलं उत्तर बरोबर की चूक तेही समजायचं नाही.....
नंतर ते गणितं सोडवण्याच्या पद्धती /रीत  सांगायचे आणि उत्तरापेक्षा पद्धत बरोबर असेल तर उत्तर बरोबर येतंच अस म्हणायचे ...

तसं शाळेत काही अतिशय आवडीचे कार्यक्रम असायचे ..
प्रत्येक शनिवार शाळा सारवायची .
अतिशय आवडीचा कर्यक्रम ... कधीही न चुकवण्यासारखा ...

म्हणजे शाळेत गेल्यावर प्रार्थना झाली रे झाली की लगेचच ह्या सत्कृत्यासाठी इतर वेळी मागे असणारी मुलांची टोळी पुढे यायची . मग कुठून कुठून शेण जमवायचं , विहिरीवरून किंवा नदीतून पाणी आणायचं , झाडाचे टाळे घ्यायचे आणि शाळा सुटायची वेळ होऊन गेली तरी थांबून हे काम पूर्ण करायचं !
सगळं झाल्यावर गुरुजी शाबासकी द्यायचे , खूप छान वाटायचं आणि मुख्य म्हणजे या दिवशी कोणत्याही प्रकारचा अभ्यास नसायचा ...
 😀

असाच असणखी एक कर्यक्रम म्हणजे
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन असायचं आणि रात्री मुलां मुलींचे नाच , गाणी , छोटी नाटकं  असायची. सर्व पालक आपल्या मुलांचे कर्यक्रम पहायला आवर्जून यायचे.
या मध्ये सप्रे गुरुजींचा सहभाग आवर्जून असायचा . ते रंगकर्मीच होते .
त्यांनी एक गाणं बसवलं होतं ...
" लाल टांगा घेऊन आला 
आला टांगेवाला ...
ऐक लाला गाणे गातो ला..ला...ला "
याला पचल येथील SVM शाळेत प्राथमिक शाळांच्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं होतं ....

सप्रे गुरुजींच्या घरी सातवीत असणाऱ्या आम्हा मुलांची रात्री शिकवणी चालायची .या करता कोणतंही शुल्क नव्हतं, केवळ रिझल्ट चांगला लागावा हा हेतू होता . 
आता असे सेवावृती शिक्षक लाभण शक्य नाही ...

त्यांच्या घरी पोस्ट ऑफिसही होत , तीही जवाबदारी गावच्या हितासाठी त्यांनी पार पडली होती .

मंडळी आपल्या दत्ताच्या उत्सवात कीर्तन करण्याचं महत्वाचं काम काही वर्षे त्यांनी केलं, ज्यावेळी
मंडळाची आर्थिक परस्थिती यथा तथाच होती ....
काही काळ आपण नाटकंही करीत होतो , त्यामध्ये अडलेल एखादं काम हक्काने गुरुजींना सांगावं व त्यांनी ते करावं असा प्रघातच होता ...
या वर्षीच्या उत्सवामध्ये , घरून  प्रसाद आणण्याची जी प्रथा आहे ती अकुलने सांभाळली होती. गुरुजींनीही त्या दिवशी प्रसाद आणला होता व हे दोघेही शेजारी शेजारी बसून काही वेळ गप्पा मारीत होते.
तीर्थ प्रसाद झाल्यावर मी , अनुजा , श्रेया आणि अकुल या सर्वांची त्यांच्याशी ओळख करुन दिली आणि आम्ही त्यांना नमस्कार केला ....

"ही तुझी मुलं ... 
काय करता तुम्ही .... "

नंतर अनुजाकडे पाहून

" हा एवढासा होता ....आता ...."

एवढं बोलून ते हसले ....

त्यांच्या चेहऱ्यावरून  काळ खूप झपाट्याने मागे पडत असल्याची जाणीव झाली ...

केवळ शिक्षकच नव्हे तर गावातील इतर जवाबदर्या तन्मयतेने पार पाडणाऱ्या सप्रे गुरुजींना माझा साष्टांग नमस्कार .

अनंत (नंदा ) प्रभुदेसाई
11 जून 2021

Wednesday, 28 April 2021

आम्ही साजरा केलेला गुढीपाडवा

*आम्ही साजरा केलेला गुढीपाडवा*

आज गुढीपाडवा !!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला शुभ मुहूर्त ...

काही दिवसांपूर्वी ती त्या कंपनीमध्ये इमाने इतबारे नोकरी करीत होती .घरची परिस्थिती जेम तेम होती .तिच्या वडिलांच्या एका मित्राने एक मुलगा सुचवला व हीच लग्न झालं ...

काही दिवस गेले आणि साडेसाती सुरू झाली .नवरा हिचे सगळे पैसे काढून घ्यायचा , नीट वागायचा नाही आणि हिला divorce घेण्यासाठी तगादा लावला, व डीव्होरस झाला .
घरची परिस्थिती बिघडली , हिची नोकरी गेली व वडिलांना दारू च व्यसन लागलं ..
आई आणि ही हताश झाली , काहीही सुचेना ..कोणीही मदत करण्याला पुढे येईना ...

तिच्या ऑफुसमधील एका मैत्रिणीला ही सर्व स्टोरी माहीत होती , तिने यांच्यातून तिला हात द्यायचं ठरवल , पण ते सोपं थोडच होतं...
पहिल्याने एक वकिलांची ओळख काढून , तिच्याबरोबर कोर्टाच्या एक दोन हीअरिंग केल्या , तिला धीर दिला व डिओरस मिळवला , त्यातून तिची सूटका केली.
आता हिची नोकरी जाण्याचं कारण म्हणजे तीच कामात लक्ष नसणं अस दिल होतं.
मैत्रिणीने HR गाठलं , आपली ओळख पणाला लावली आणि कामावर का लक्ष लागत नव्हता ते त्यांच्या निदर्शनास आणून दिल !!

एक दिवस  मैत्रिणीला receptoinist ची जागा कम्पनिमध्ये आहे असं समजलं ...
हिने HR, accounts, personal सगळीकडे हिची केस लढवली आणि तिच कॉल लेटर  मिळवलं ...
अजूनही नशीब साथ देत नव्हतं . मैत्रीण स्वतःच करोना पोसिटीव्ह झाली आणि हाताशी आलेला घास जातो की काय अस झालं ...
मैत्रिणीचे 3-4 दिवस कोविड टेस्ट वगैरे मधे गेले , पण हाताशी लॅपटॉप , मोबाईल फोन आणि जिद्द होतीच हिला काहीही करून नोकरीला लावायचच....

मधल्या काही वेळात मैत्रिणीचे आई वडीलही पोसिटीव्ह झाले , त्यांच्या टेस्ट , औषधे हीन manage केलं ...

काल सोमवार तारीख 12 एप्रिल 2021 , हिचा interwiew कम्पनी मध्ये झाला , मैत्रीण सकाळपासुन लॅपटॉप वर कॉन्टॅक्ट मध्ये होती.
आणि संध्याकाळी हिच्या हातात अपॉइंटमेंट लेटर मिळालं ...
आज 13 तारीख 2021 गुढीपाडवा , आम्ही तो कालच साजरा केला , एक घरात छोटीशी पणती पुन्हा लावून !!!

तीच नाव काही कारणास्तव अत्ता सांगता येत नाही .

मदत करणाऱ्या मैत्रिणीच नाव  :
*श्रेया प्रभुदेसाई*

माई मावशी !!

माई मावशी !!
आज पुढच्या प्रवासाला निघून गेली ....
मावशीच्या काही खास गोष्टी होत्या ...
तिने मला क्यारम खेळायला  शिकवलं !
रात्री उशिरा पर्यंत आम्ही दोघ carrom खेळायचो.  अलिखित नियम म्हणजे शेवट नेहमी मावशीने जिंकल्यावरच व्हायचा , भले रात्रीचे 2  2.30 वाजले तरीसुद्धा ....
मावशीची कौतुक करण्याची पद्धत पण वेगळी होती ....
श्रेयाला 10 वी ला कमी मार्क्स होते आणि तिला कोणत्या साईडला पाठवाव या संभ्रमात आम्ही होतं ....

मावशी ने सांगितलं माझं ऐकायचं असेल तर सांगते तिला चांगल्या कॉलेजला टाक ......
प्रभुदेसायांची लेक आहे ती 
....पडेल ....अडखळेल ..पण उभी राहीलच ...

ताई , शोभाताई , मंदा ह्या तर तिने आणि भाऊंनी दिलेल्या आधारामुळेच पारल्यात राहू शकल्या , शिक्षण पूर्ण करू शकल्या.

आमच्या बाबतीत मामी स्वर्गवासी झाल्यावरचा ती आधार होती . पारल्याला गेल्यावर तिच्याकडे हक्कच चहा पाणी वसूल केल्याशिवाय बर वाटायचं नाही !!

खुप आठवणी आहेत .

भारती , विवेक , मेधा 
शिरुषजी , सतिशजी , मेधा वहिनी आणि सर्वांनी एकमेकाला आधार द्या . ईश्वरी ईच्छा प्रमाण मानून  तुम्हा सर्वांना तोच आधार देईल याविषयी खात्री वाटते .

नंदा .

Sunday, 7 March 2021

भूत-भुताटकी-चकवा

*भूत-भुताटकी-चकवा*

गावात भूत भताटकीच्या गोष्टी आपण खूप ऐकतो. काहींचा प्रत्यय आपणाला आजही येतो...
अस म्हणतात या भुता खेतांच्या गोष्टींची सत्यता आपण शक्यतो तपासून पाहू नये !!!

तर मी ही ऐकलेली ही गोष्ट ....

मंडळी ही गोष्ट ज्यावेळी फक्त बैलगाडीने राजापूरहून दुकानाचा माल आणला जात होता त्याकाळातील आहे .(साधारणपणे 100 -१५0 वर्षापर्वीची)
राजापूरहून माल घेऊन संध्याकाळी निघालेल्या बैलगाड्या सकाळी पाचल , तळवड्याला पोचायच्या , जर वाटेत काही अडचण आली नाही तर ...
अजूनही आपण पाहू शकतो सौंदळ पासून राजापूरला जायचा बैलगाडीसाठीचा रस्ता वेगळा आहे. सध्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने हा रस्ता जातो.

इथे एक शंकराचं देऊळ ही आहे .सौंदळ तस मुस्लिम वस्तीच गाव असलं तरी सुद्धा शंकराचं मंदिर पूर्वी पासून आहे .

राजापूरहून माल घेऊन निघालेल्या बैलगाड्यांना नदीच पात्र पार करून , मोठा चढाव चढून वर यावं लागायचं . चढ चढून मालाने भरलेली गाडी, पहिल्या फटक्यात (प्रयत्नात ) जो गाडीवान वर आणेल तो खरा गाडीवान अस मानलं जायचं त्याकाळी ....

त्याला कारणही तशीच होती ....

एकतर राजापुरपासून भरलेली गाडी इथे येईपर्यंत बैल थकून जायचे , आणि रात्रीचे 1 , 2 वाजायचे . डोळ्यात बोट घातल तरी समजणार नाही असं मिट्ट काळोख असायचा. नदीच्या पात्रातून वरती चढण्याचा चढवाचेच चार रस्ते होते, एक रस्त्यावरुन थोडं मागे जायचं व एक वळण घेतलं की आपला पाचल तळवड्याचा  रस्ता दिसायचा , दुसरा रस्ता तुम्ही पकडलात व वर आलात की तुमच्या लकशात यायचं तुमचा रस्ता चुकलाय व तुम्ही उलट बाजूला आलाय, आणखी एक रस्ता सौंदळ गावात जायचा आणि चौथा आणि शेवटचा तुळसवडे ह्या गावात जायचा .

नदीचं पात्र पार झालं की ह्या रस्त्याला लागण्यापूर्वी एक प्रथा होती त्याकाळी .....

गाडीवानाने इथे पोचल्यावर गाडीतून उतरायचं आणि कुकारा (हाक) मारायचा व
" गाड़ी वर येऊ दे काय ?" अस विचारायचं !!

त्या भयाण रात्री सुद्धा आपण मारलेल्या कुकाऱ्याला उत्तर म्हणून दुसरा कुकारा ऐकू यायचा..

मंडळी , प्रथेप्रमाणे जर तूम्ही साद दिली नाही आणि प्रतिसाद येण्यापूर्वीच पुढे आलात तर ...

भाद्रपद महिना होता आणि आमची गाडी राजापूरहून माल भरून निघाली होती.गाडीत भाऊ आणि गाडीवान तुकाराम हातणकर होते. 
कधी नाही तो तुकारामांचा डोळा लागला .....
आणि नेहमीच्या सवइ प्रमाणे बैलांनी घरचा रस्ता बरोबर पकडला . गाडी नदीतून वर आली आणि अर्ध्या रस्त्यात बैल उभे राहिले आणि पुढे जाईनात....

तुकारामाने हर प्रयत्न केले पण बैल जागा सोडेंनात....
शेवटी तो गाडीतून खाली उतरला आणि दहा पावलं चालत पुढे गेला आणि  ......  
त्याला दरदरून घाम फुटला....
धावत धावत येऊन त्याने भाऊंना उठवलं , पण पुढे काही त्याच्या तोंडून नीट शब्दच येईनात....

भाऊंना काय झालं याची थोडीफार कल्पना आली होती ....

भाऊंनी तुकारामाला

 "गाडी मी परत येईपर्यंत इथून हलवू नकोस आणि काही झालं तरी तू गाडीतून खाली उतरू नकोस " अस सांगितलं
आणि त्याही परिस्थितीत त्यांनी त्या देवळाचा रस्ता धरला ... 

दुसऱ्या दिवशी घरी अनंताची पूजा होती व भाऊ पूजेला बसणार होते.

भाऊ शंकराच्या देवळात आले , नमस्कार केला , 
" उद्या अनंताची पूजा आहे , चूक -भूल पदरात घे , आणि गाडीला रस्ता दाखव " 
अस सांगून नमस्कार केला ...

आणि देवळातून बाहेर पडले  मात्र .....

देवळाच्या मागच्या बाजूनं डोक्यावर घोंगडी घेतलेला  एक रांगडा गडी जाताना म्हणाला .....

" पूजा हाय म्हणून तूला आज सोडलंय...... 
मला साद (हाक) का नाय दिली....
जा आता गुमान......"

ती बघ गाडी आणलीय मी वर ....

आश्चर्य म्हणजे खरोखरच गाडी देवळा समोर उभी होती ....

आणि तुकाराम 

"लय येळ (वेळ) लाऊ नका शेट...  येळत जया हवं "
असं भाऊंनाच सांगत होता ...."

मंडळी रस्त्यात तुकारामाने अस काय पाहिलं ....

नंतर हे लोक घरी आले , पूजा झाली ..

दोन तीन दिवसांनी तुकारामाला राजापूरहून येताना त्या दिवशी काय झालं होत म्हणून विचारलं तर....

दोन दिवसांपूर्वी रस्त्यात गाडी अडली होती , त्याने भाऊंना उठवलं होतं.
इथपर्यंत त्याला सांगता येत होतं .... 

नंतर एकदम ....

"शेट रातच्या वक्ताला कालोखातून देवलात कशापायी गेले , अन आले हे बरी माझ्या   धेनात आजूनबी नाय आलं ....."
असं तो म्हणत होता ...
   
काय झालं होतं तर गाडीतून खाली उतरल्यावर रस्त्यात मधोमध दोन चुली पेटलेल्या व बाजूला घोंगडी पांघरून हातात एक मोठी काठी घेऊन बसलेली एक माणसासरखीच विचित्र अशी आकृती  त्यानं पहिली होती ......
रात्रीची वेळ असल्यामुळे तो घाबरला होता ....भीती वाटण्यासारखच ते सगळं होतं ....

नंतर भाऊनीही ते सर्व  बघितल .....
थोडं त्यांच्याही मनात चर्रर्रर्र झालं ...
पण थोडा धीर दाखवून त्यानी देवळात जायचा निर्णय घेतला होता ...


तर अशीही भुताटकी , चकवा... 
याचा अनुभव ज्यांना येतो त्या काही जणांनाच त्या विषयी नंतर सांगता येत.
खूप जण तंद्रीतच सर्व करतात जे त्यांना नंतर सांगताच येत नाही...

तळवड्याला आमच्या घरी , जवळच असलेल्या तेलंब्यावरच भूत , त्याच लसणीच तिखट व तेलासाठी मृग नक्षत्राच्या सुरवातीला रडणं , मांडवकराचा फणस (त्याने लावलेलं फणसाचा झाड )
या सर्वांची घरात काही विशेष असेल तर  आजही आठवण ठेवावी लागते  , करावी लागते केली जाते.... 

वीसरलात तर .....


याविषयी पुन्हा कधितरी ....


अनंत (नंदा ) प्रभुदेसाई
07 मार्च 2021