Monday, 30 September 2019

अनंताची पूजा आणि तो सोंगट्टयाचा डाव..….

*अनंताची पूजा आणि तो सोंगट्टयाचा डाव..….*

आपल्या घरी होत असलेल्या अg gfनंत पूजेचा वारसा खूप मोठा आहे. ही पूजा म्हणजे एक सोहळाच आहे.
यानिमित्याने गावातील लोक आपल्या घरी होणारी भाजी म्हणजे पडवळ, भोपळा, काकडी अस काहीही आनंदने प्रसाद म्हणून आणून देत असत, तर काही वेगवेगळी फुल, पत्री, कमळ अस जे शक्य असेल ते आणून देत.

पूजेला भाऊ  व मामी बसायचे. नाना सप्रे यथासांग पूजा सांगायचे.अंबुताई म्हणजे नानांच्या सौ , सवाष्ण व जेवणासाठी मामीला मदत म्हणून अगदी सकाळपासूनच हजर असायच्या .
घरातील 25 -30 माणसं, 4-5 गडी, फुलं - भाजी आणून दिलेलें, आयत्या वेळी प्रसादासाठी आलेले असे सुमारे 80 -90 लोक जेवायला सहज असायचे.
अनंत पूजेसाठी लागणारे 14 प्रकारच्या भाज्या, कोशिंबरी तर असायचाच शिवाय वडे , घारगे व मोदक असायचे. जेवणावळी (पंगती ) समपेपर्यंत संध्याकाळचे 5 वाजयचे.
आमचया गणपतीचं विसर्जन अंनंताच्या दुसऱ्या दिवशी व्हायचं.

नंतर रात्रीची तयारी . रात्री गावातील सर्व ब्राह्मण मंडळींला आरत्या म्हणण्यासाठी बोलावल जायचं. आरत्या म्हणणारे एक्स्पर्ट आवर्जून आजू बाजूच्या गावातून यायचे.
बाळ्याकाका काय माणूस हो .... एकदम प्रसन्न व हसरा चेहरा .... त्यातच त्यांनी तंबाखू , चुना , कात,  सुपारीच पान खाल्ल की तोंड एकदम लाले लाल व्हायचं , व चेहरा आणखीनच खुलून दिसायचा. ढोलकी अशी वाजवत की बाजूचा चकवा (मोठ्या झान्जा) वाजवणार्या माणसाचा ठोका चुकला तर ढोलकी वाजवण्याच्या काठीचा फटका तुमच्या हातावर बसला म्हणून समजा...
"आरत्या म्हणताना बाळ्या काकांची मी साथ केलीय "  अस काही लोक अभिमानाने सांगायचे ....
मंडळी जेव्हा मी या बाळ्याकाकाना पाहिलं तेंव्हा त्यांचं वय 78 ते 80   असावं. मस्त गोरे गोरे आजोबा, चेहरा हास्याने एकदम फुललेला ,  स्वच्छ धोतर, अंगात बंडी व त्यावर निळ्या रंगाच जाकीट.
आरत्या म्हणणारया काही लोकांची वैशिष्ट्य अशी...
शांताराम अण्णा झान्जा वाजवणार, सगळ्यांना सांभाळून घेणार.
हरिभाऊ व बापुकाका पत्की ढोलकी वजवणार. बापुकाका थोडेसे मिस्कील स्वभावाचे .
"शीरुकाका ची आरत्या म्हणण्याची हौस दाणगी पण उभं राहून राहून माझे पाय तुटले , म्हटलं याला आता कुणीतरी आवरा "
अस म्हणायचे ...
हरिभाऊ व रघुभाऊ नवीन नवीन आरत्या म्हणणार ...
बाळ्याकाकाआजोबांना अजिबात ऐकू येत नसे पण हे इतके हौशी की कोठरातल्या आर्त्यांना आंब्यातून (गवाच नाव) याययाचेच. 80 वर्षाचे आजोबा 4 तास ढोलकी वाजवत उभे राहायचे. सर्व आरत्या त्यांना तोंड पाठ होत्या.
गंमत म्हणजे एकदा आरतीची सुरवात त्यांच्या कानात सांगितली (ऐकू येत नव्हतं ना) की संपूर्ण आरती आणि ढोलकी एकदम सुरात म्हणायचे आणि वाजवायचे .
कोठारात आरत्या जितक्या रंगतात तितक्या इतर कुठेच रंगत नाहींत अस लोक म्हणायचे व याचा सर्व कोठरवाल्याना अभिमान वाटावा ....
आरत्या झाल्यावर पोहे  व कॉफी दिली जायची .
मंडळी त्या रात्रीच्या कॉफी ची चव अजूनही मी विसरलो नाहीये. मस्त जायफळ घालून आटवलेली कॉफी ....

आरत्या झाल्यावर सोंगट्या चा खेळ रंगायचा.
मांडवी विषयीं मी मागच्या एका लेखात लिहिलं आहेच .
तर या मांडवीत खेळल्या गेलेल्या सोंगट्या च्या एका डावा विषयी आता तुम्हाला ऐकवतोच ...

कोठारात न भूतो न भविष्यती असा तो खेळ त्यावर्षी खेळला गेला...

आनंतचतुर्दशीची ती रात्र. पाऊस थोडा फार पडत होता.. रात्रीचे 2 - 2.30 वाजले असतील आणि मांडवीत जाजम (मोठी सतरंजी) घातलं गेलं , सोंगट्या चा पट मांडला गेला , मधोमध बत्ती (petromax) ठेवली गेली आणि प्रत्येक बाजूचे 12 जण असे एकूण 48 गडी खेळायला बसले .
काय माहोल होता, यजमान (प्रभुदेसाई) पूर्व पश्चिम , घुगरे - सप्रे उत्तर दक्षिण , दान लावणारे बंडूकाका पिवळ्या सोंगट्या घेऊन तर त्यांचेच प्रतिस्पर्धी हरिभाऊनि काळ्या सोंगट्या घेतल्या.
प्रभुदेसाई सप्रे हिरव्या आणि तांबड्या सोंगट्या घेऊन खेळाला सुरवात झाली

हस्तिदंती पांढरे शुभ्र फासे, एकावर एक घासून  असे टाकले जायचे की त्याचा कडकडाट व्हायचा व तो आवाजच त्या रात्री भयांण वाटायचा.
मंडळी लक्षात घ्या , 48 लोक खेळत होते , केवढा  मस्त माहोल असेल ना ??
यामध्ये अगदी 80 वर्ष वय असलेल्या म्हातारयांपासून , 60 -70 वय असलेले सर्वजण होते. 48 खेळाडूंनी खेळला जाणारा हा एकमेव खेळ असावा.

मंडळी बडूकाकांविषयी आणि त्यांच्या सोंगट्याच्या खेळाच्या वेडा विषयी काय सांगावं. घरीं हा माणूस पट मांडायचा आणि चारही बाजुनी एकटाच खेळायचा ...
यजमानांपासून सुरवात म्हणून भाऊंनी फासे हातात घेतले आणि मनापासून डाव्या कानाजवळ नेऊन आवाज करून टाकले. एकच आरोळी उठली आणि आता यजमानांनी सुरवात तर केलीच आहे तर आता कोण जिंकतो बघूया, अशी आरोळी उठली. पटावरच्या दोन सोंगट्या बाहेर आल्या
अजून 11 जण खेळायचे बाकी होतें.
जर सगळ्या सोंगट्या बाहेर आल्या व सम्पूर्ण पट फिरून घरात (home) गेल्या तर खेळच संपला ...
पण तसं व्हायचं नव्हतं...
पुढच्या बाजूच्या पार्टीकडे आता फासे गेले ज्यात बंडूकाका एकपाय दुमडून बसले होते. त्यांनी पहिल्या भिडूच्या  पाठीत धपाटा घातला आणि ओरडले "आठ पाहिजेत , उठून बस ,  फासे टाक... तू बोलशील तस दान फासा देईल ... सगळ्या सोगट्या बाहेर हव्यात माझ्या... आज ह्या सगळ्यांना दखवतोच , सोंगट्टयाचा डाव मीच जिंकणार " झालंही तसच ... पहिल्या 2 सोंगट्या ज्या यजमानांनी बाहेर काढला होत्या त्या बंडूकाकांनी मारल्या व आपल्या तीन सोंगट्याना चाल देऊन , पुढच्या भिडूना फासे दिले.

मंडळी लक्षात घ्या 48 जण खेळतायत पण पटावर फक्त 3 सोंगट्या..

आता सोंगट्याचे माहीर  रघुकाकांच्या हातात फासे होते . त्यांनी त्यांचा इरादा सांगितला .... "अरे नाना बघतोस काय ..घे फासे आणि बोल 6 ... 8  आणि सक्रे सात ( एका फॅशयावर 6 व दुसऱ्यावर 1 रेजा , याला अस म्हणण्याची पद्धत) हवेत ...अरे ह्या बंड्याच्या तिन्ही सोंगट्या मारून , माझ्या दोन ना चाल नाही दिली तर साला पुन्हा सोंगट्या ना हात नाही लावणार ....
आतापर्यंत शांतपणे चालणारा खेळ हळू हळू रंगू लागला व वातावरण तापू ही लागलं ....
रघुभाऊच्या भिडूना हवं तसं दान पडलं आणि फासे रघुभाउंकडे आले.
त्यांनी एकदा फासे निरखले , बंडूभाऊंकडे रागाने तीरपी नजर टाकली , आणि फासे असे काय कानाजवळ नेऊन एकमेकांवर घासले की त्या फाशांचा येणारा आवाजच चमत्कारिक वाटला.
त्यांनी सकरे सात हवेत म्हणून फासे फेकले आणि सात पडताच बंडूकाकांच्या तीन्ही सोगट्या अशा काय बसल्या जागेवरूनच हणल्या की बंडूकाकांच्या अंगाचा तिळपापड झाला.
मंडळी 48 जण खेळतायत , आरडा ओरडा, एकमेकांच्या कुरापती इतक्या शिगेला पोचल्या की ज्याचे नाव ते ...
थोडं बांडूकाकां ह्या माणसा विषयी सांगितलंच पाहिजे..
बंडूकाका म्हणजे काय तगडा माणूस  !!!
नाश्त्याला नाचणीच्या चार भाकरी , प्रत्येकी दोन भकरींच्या मध्ये लसणिच्या लाल तिखटाचा थर व वरती 200 ml शेंगडण्याच तेल फस्त करणारा हा माणूस..

" रघु , एकदा फासे माझ्याकडे येउ देत , तुम्हा सगळ्यांच्या सोंगट्या पटाबाहेर नाही काढल्या तर ह्या कोठरवाल्यांकडे शपथ घेतो की पुनः सोंगट्या हा विषय बंद..."
बंडूकाका
"अरे बंड्या , फुकट हवेत बार नको काढुस ,फासा बोलले पाहिजे फासा...." रघुभाऊ
आता वातावरण खेळ बाजूला राहून चिघळायला लागलं!!!
पण असं नाही झालं तर खेळ पण रंगत  नाही ...
आता फासे बंडूकाकांच्या पार्टीकडे होते . पहिल्या दोघा तिघांना म्हणावं तस दान न पडल्यामुळे बंदुकाकांचा पारा चढला ,  त्यांनी फाशांना आपल्या मस्तकी लावलं आणि जोरजोरात कडकडाट करीत फासे टाकले .. आणि 8 घेतले..
पुन्हा  6 पडले ,
"हरी बघतोस काय उडव त्या सोंगट्या , आणि बोल किती हवेत , ह्या रघुची एकही सोंगटी मला पटावर दिसता कामा नये"

"अरे हे फासे काय तुझ्या रक्तात बुडवलेत काय "
इति रघुभाऊ
"तसं समज हवं तर पण आता बघच फासा काय बोलतो ते ..."
अस म्हणून बंडूभाऊनी फासे टाकले मात्र आणि काय आश्चर्य एक फासा चक्क उभा राहिला ....
बंडूभाऊनी एक सोंगटी हातात घेऊन फेकून रघुभाऊंच्या सोंगटीवर मारली,  दुसरी घेतली आणि "अरे हरी , हांण ती सोंगटी... रघुच्या सगळ्या सोंगट्या मार ....
असं म्हणणार तोच

" कशी मारतोस तेच बघतो, मला कस दान लावलंस ते आधी सांग " रघुकाका

"अरे रघु , माझा फासा उभा राहिलाय , म्हणजे त्याच्या चारही बाजूचं सगळं दान, 4 & 6 आहेत म्हणून मला पुन्हा खेळायचा अधिकार आहेच " अस म्हणून बंडूभाऊनू सोंगटी बसल्या जागेवरूनच  फेकून मारली आणि दोघेही हमरा तुंमरीवर आले आणि दोघानीही  एकमेकांच्या गच्यांड्या पकडल्या...
एकच गोंधळ झाला , काहींनी मजा चालली आहे समजून दोन्ही पार्टीच्या इतर खेळाडूंनी एकमेकांशी मोठ मोठ्याने ओरडून झोंबा झोंबी सुरू केली ,  फेकून मारलेली सोंगटी बत्तीला (petromax) लागली आणि तिची काच फुटली व कळोंख झाला... एकच आरडा ओरडा झाला... घरातील सर्व बायका, मुलं भांडणाच्या आवाजाने मांडवीत धावली ,  कारण काय झालं तेच नीट समजेना.

रात्रींचे तेव्हा 4 वाजले होतें... ह्या दोघांना काळोखात आवरताना कुणालाच काही समजेना ...
भांडणाचा आवाज एवढा मोठा की कोठरवाल्यांच्या दुकानावर दरोडा पडला समजून शेजारचे लोक हातात मिळेलं ते घेऊन धावून आले ...
हे 50 लोक आणि इतर गावातले 100 लोक हातात काठ्या वगैरे घेईन धावले व मांडवीत जीथे खेळ चालला होता तिथे काचाच काचा व काळोख ... कुणालाही काही समजेना... एकच हल कल्लोळ झाला....

गडबडीत चोर समजून कुणालातरी मार पडला तर काय करायचं ...
अशी परिस्थिती..

शेवटी भाऊनि सर्वाना मोठ्या आवाजात काहीही झालेलं नाहीये .  अस सांगून कस बस आवरलं .
तोपर्यंत सकाळचे 5   5.30 वाजले होते . चक्क उजाडलं होतं

सर्वाना स्थिर स्थावर करेपर्यंत सकाळचे 6 वाजले ....

भाऊंनी सर्वांना चहा घ्या म्हणून सांगितलं .

150 -200 कप चहा मामीने केला व सर्वाना दिला ...

" बामन काय खेळतत त्ये हमका समाजल बारी नाय "
अस म्हणून लोक आपल्या घरी निघुन गेले.

मंडळी,  भाऊंनी बंडूकाका व राघूभाऊना जवळ बोलावलं , एकमेकांचा हात हातात दिला, व बाबानो हा खेळ होता , बर झालं काय बर वाइट झाल नाही असं म्हणून हा न भूतो न भविष्यती आशा खेळाची सांगता केली ....

मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनंताच्या रात्री आपल्या घरी असाच सोंगट्याचा खेळ रंगत आलाय ...

उगाच नाही लोक म्हणतात सोंगट्या खेळायच्या तर त्या फक्त कोठारातच, ती मजा इतर कुठेही येण शक्य नाही....

आता 25 ते 30 वर्षानी आपण सर्वांनी प्रेत्येकाच्या घरी गणपती आणायचं ठरवलंय ....
त्यातच तळवड्याचा नंबर पण लागू शकतो....
तर पुन्हा एकदा मांडायचा का सोंगट्याचा पट.....

अनंत प्रभुदेसाई.

No comments:

Post a Comment